अवैध गौण खनिज उत्खनन: चंद्रपूर गुन्हे शाखेकडून 6.05 लाखांचा माल जप्त

May 21, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गौण खनिजांच्या छुप्या तस्करांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने आपली कडक मोहीम सुरूच ठेवली आहे. याच मालिकेचा एक भाग म्हणून, दि. २० मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि उपविभाग मूल पथकाने संयुक्तपणे एक मोठी कारवाई केली. पाथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मौजा अंतरगाव नाला परिसरातून काही इसम शासनाच्या महसूल विभागाची कोणतीही परवानगी न घेता, अवैधरित्या गौण खनिज म्हणजेच रेतीचे चोरटे उत्खनन करून तिची वाहतूक करत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पोलिसांच्या बातमीदाराने दिली होती. या मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने अत्यंत सतर्कतेने अंतरगाव नाला परिसरात सापळा रचून धाडसी छापा टाकला. या छाप्यात रेतीची चोरटी वाहतूक करताना एका आरोपीला रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आले. (भद्रावतीमध्ये सुगंधित तंबाखू जप्त)

 

या प्रकरणी पोलिसांनी अनिल मनोहर राऊत, वय ३६ वर्षे, राहणार पाथरी, तालुका सावली या आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून एकूण ६,०५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ६ लाख रुपये किमतीचा एक विना क्रमांकाचा, ट्रॉलीसह असलेला ट्रॅक्टर आणि ५ हजार रुपये किमतीची एक ब्रास चोरीची रेती जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १०२/२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२), तसेच महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याच्या कलम ४८(७), ४८(८) आणि मोटार वाहन कायद्याच्या (M.V. Act) कलम १७७ अन्वये गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

 

गौण खनिजांची चोरी रोखणारी ही यशस्वी आणि धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि उपविभाग मूल पथकाच्या अधिकारी व अंमलदारांनी अत्यंत चोखपणे पार पाडली. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे परिसरातील रेती तस्करांचे धाबे दणाणले असून, अवैध उत्खनन करणाऱ्यांवर मोठा वचक निर्माण झाला आहे. जिल्ह्यामध्ये यापुढेही अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर पोलिसांची करडी नजर राहील आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Leave a Comment

+