ड्युटी संपली रेल्वे थांबली, महिलांचा आक्रमकपणा बघून रेल्वे प्रशासन नरमले

News34

चंद्रपूर – मागील काही दिवसांपासून गोंदिया-बल्लारपूर रेल्वे मार्गावर चालणाऱ्या ट्रेन 23 ऑगस्ट पर्यंत तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहे, मात्र गोंदिया वरून सायंकाळी 6 वाजता सुटणारी बल्लारपूर जाणारी एकमेव रेल्वे सुरू आहे, ही रेल्वे रात्री 10.30 वाजता चांदा फोर्ट रेल्वे स्टेशनवर पोहचते मात्र 20 ऑगस्टला ही रेल्वे तब्बल साडेतीन तास उशिरा पोहचली.

सायंकाळी गोंदिया वरून सुटणारी ही रेल्वे मूल स्टेशनवर रात्री 12 वाजता दाखल झाली, मात्र तिथून ती रेल्वे पुढे सरकत नव्हती, याबाबत मोटरमन ला प्रवाश्यानी विचारणा केली असता त्याने सांगितले की माझी ड्युटी 11 वाजता संपली आहे, मला लेखी आदेश मिळाल्याशिवाय मी रेल्वे पुढे नेऊ शकत नाही.

यावर प्रवाश्यानी आक्षेप घेत स्टेशन मास्टर ला जाब विचारणा केली, मात्र त्यांनी आधी काही प्रतिसाद दिला नाही, महिला प्रवासी यावर स्टेशन मास्टर वर चिडल्या आमच्या सोबत काही प्रवासी आहे, त्यांची प्रकृती बरोबर नाही, जर प्रवाश्यांना काही झालं तर त्याला जबाबदार कोण असे खडेबोल महिलांनी स्टेशन मास्टर ला सुनाविले.

दीड तासाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर स्टेशन मास्टर ने वरिष्ठांना विचारणा करीत मोटरमन ला लेखी आदेश देत रेल्वे पुढे न्यायला सांगितली, त्यानंतर सदर रेल्वे ही रात्री 2 वाजता चांदा फोर्ट ला पोहचली, रेल्वे प्रबंधनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका प्रवाश्याना बसल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

Leave a Comment