वडेट्टीवार यांचे विधान विरोधी पक्षनेते पदाला न शोभणारे – भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

News34

चंद्रपूर – 2024 मध्ये मोदीजी पंतप्रधानपदाची शपथ घेतील त्यावेळी चंद्रपूरचा खासदार त्यांच्यासाठी हात उंच करेल. महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना व अजित पवार सोबतीने 45 हून अधिक लोकसभा जागा निवडून येतील असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. भाजपा कार्यकर्त्याने निश्चय केला असून, काँग्रेसची अमानत जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावा त्यांनी केला.

भाजपाच्या राज्यव्यापी लोकसभा प्रवासाची सुरुवात त्यांनी चंद्रपूर येथून केली. संपर्क से समर्थन अभियानांतर्गत त्यांनी चंद्रपूरच्या तुकुम परिसरात आणि वणी येथील शिवाजी चौक परिसरात नागरिकांच्या भेटी घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने मागील नऊ वर्षांत राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवित संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी या देशातून भ्रष्टाचार उपटून काढण्याचे काम केले. मागील 9 वर्षात एकही दिवस आराम न करता विकासाचा अजेंडा घेऊन काम करीत आहेत. जनतेच्या मतांचे कर्ज ते इमानदारीने विकासकामे करून व्याजासकट परत करीत आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात अपघाताने काँग्रेस चा उमेदवार निवडून आला. आगामी निवडणुकीत असा अपघात होऊ देऊ नका. तसेच, आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसला चंद्रपूरच्या मातीत मिसळून टाका असेही ते यावेळी म्हणाले.

चंद्रपूर लोकसभा प्रवासात भाजपा प्रदेश लोकसभा प्रवास संयोजक बाळा भेगडे, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, विदर्भ संघटनमंत्री डॉ उपेंद्र कोठेकर, चंद्रपूर लोकसभा समन्वयक धर्मपाल मेश्राम, चंद्रपूर शहराध्यक्ष राहुल पावडे, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, यवतमाळ जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, चंद्रपूर लोकसभा निवडणूक प्रमुख, सर्व विधानसभा निवडणूक प्रमुख यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

वडेट्टीवारानी बेजबाबदार विधाने करु नयेत

विजय वडेट्टीवार हे नवीन विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यांनी बेजबाबदार विधाने करु नयेत. ते ज्या पदावर आहेत, ते संवैधानिक पद आहे. त्यांच्याजवळ काही माहिती असेल, तर ती तपास यंत्रणेला त्यांनी द्यावी. त्यांचे विधान त्यांच्या पदाला शोभणारे नाही. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न अकारण निर्माण होतील.

मेश्राम यांची भेट स्मरणीय

चंद्रपूरच्या तुकुम परिसरात ढोल ताशांच्या गजरात त्याच स्वागत झाले. बुरडकर सभागृहात राजूरा बल्लारपूर व चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकाऱ्यांना मागदर्शन केले. चंद्रपूर येथे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व रिपब्लिकन नेते प्रा. बी.डी. मेश्राम यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांना मोदी सरकारच्या नऊ वर्षांचा कार्यकाळ व कार्यपद्धतीची माहिती दिली. प्रा. मेश्राम यांनी सविधानाची प्रत मला सस्नेह भेट दिली. ही भेट मला कायम स्मरणात राहणारी असल्याची भावना बावनकुळे यांनी व्यक्त केली. आखिल भारतीय धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम सातपुते यांच्या निवासस्थानी भेट दिली.

यावेळी भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, शहर अध्यक्ष राहुल पावडे, महिला आघाडी अध्यक्ष अंजली घोटेकर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, विशाल निंबाळकर सहित असंख्य भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

वणीच्या शेतकरी मंदिरात मार्गदर्शन

वणी येथील शिवाजी चौकात जेसीबी लावून पुष्प वर्षाव करून त्यांचे जय्यत स्वागत करण्यात आले. शेतकरी मंदिर येथे वणी, आर्णी आणि वरोरा विधानसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकाऱ्यांना मागदर्शन केले. वणीचे प्रसिद्ध व्यावसायिक जयस्वाल समाजाचे अध्यक्ष राजा जयस्वाल याच्या आणि तेली समाजाचे नेते संजय निमकर यांच्या घरी त्यांनी भेट देत भाजपा सरकारच्या कामगिरीची माहिती दिली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!