Chandrapur journalist
प्रजासत्ताक दिनाला घडला प्रकार
chandrapur journalist : चंद्रपूर जिल्ह्यातील चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार, मात्र २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाला या चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न चंद्रपूर पोलीस विभागाने केला आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी अनियंत्रित झाली असून त्याकडे लक्ष न देता पत्रकारांना नियंत्रित करण्याचे काम पोलीस विभाग करीत असल्याचे चित्र पुढे आले आहे.
२६ जानेवारीला पालकमंत्री डॉ अशोक उईके यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता, पालकमंत्री कार्यक्रम स्थळी आले, पथसंचलन पूर्वी पालकमंत्री उईके हे वाहनाद्वारे पोलीस पथकाची पाहणी करीत होते. त्यावेळी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी चित्रण करीत होते.
चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री उईके
पण काही वेळातच पोलीस अधिकाऱ्यांनी चित्रण करण्यास पत्रकारांना मज्जाव करण्यास सुरु केले, इतकेच नाही तर त्यांचा हात पकडत बाहेरचा रस्ता दाखविण्याचे काम पोलीस अधिकाऱ्यांनी केले. हा सर्व प्रकार पालकमंत्री उईके यांच्या समोर घडला, पत्रकारांनी आपली एकजूट दाखवीत कार्यक्रमाच्या चित्रीकरणावर बहिष्कार टाकत पोलीस विभागाचा निषेध करीत बाहेर निघाले.
चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारी अनियंत्रित झाली मात्र त्याकडे पोलीस विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष आहे, शहरात खुलेआम सट्टा, गांजा विक्री, सुगंधित तंबाखू विक्री होत आहे, विशेष बाब म्हणजे वर्ष २४ – २५ मध्ये शहरात घडलेल्या क्रूर हत्याकांडात पोलिसांचे मूल आरोपी होते, पोलीस विभागातील कर्मचारी घरफोडी व हत्या करीत होते मात्र याचा थांगपत्ता पोलिसाना लागत नाही हे आश्चर्य म्हणावं लागेल.
राज्यातील इतर सर्व जिल्हे वगळता चंद्रपुरात पोलिसांनी पत्रकारांवर अनेक नियम लादण्याचे प्रकार केले आहे, लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर पत्रकारांना मोबाईल व कॅमेरा नेण्यास मज्जाव करण्यात आला होता, चंद्रपूर जिल्ह्यापेक्षा गडचिरोली जिल्हा हा अतिसंवेदनशील आहे मात्र त्याठिकाणी पत्रकारांवर असे निर्बंध लादण्यात येत नाही.
चंद्रपुरात काही घटना घडली तर त्याबाबत प्रसार माध्यमांसमोर बोलण्यास अधिकारी नकार देतात, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुलाखत घ्या असे सांगतात, हे चित्र फक्त आपल्या जिल्ह्यात आहे. वर्ष २०२४ मध्ये गुन्हगारी व गोळीबाराच्या घटनेने जिल्हा हादरून गेला होता, बाहेर राज्यातील गुन्हेगार जिल्ह्यात दाखल होत गोळीबार करीत होते. भरदिवसा गोळीबार, बॉम्बहल्ला व पोलीस स्टेशनमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या होत्या. शिवा वझरकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीना व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आली होती.
कधी जिल्ह्यातील नागरिकांनी एमडी ड्रग्स चे नाव ऐकले नव्हते मात्र आता मोठ्या प्रमाणात हे अंमली पदार्थ जिल्ह्यात येऊ लागले आहे. हे सर्व गुन्हे ज्यावेळी घडतात त्यांचा म्होरक्या कधी पकडल्या जात नाही, पोलीस विभाग यामध्ये अपयशी ठरला आहे.
गुन्हेगारी नियंत्रणात न आणू शकणारे पोलीस पत्रकारांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू लागले आहे, याबाबत गैरवर्तन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची तक्रार पत्रकारांनी पालकमंत्री उईके यांना केली आहे, पालकमंत्री यावर काही कारवाई करतात का याबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे.
