Ghuggus pothole protest । रस्त्यावरील खड्ड्यात कांग्रेस नेत्यांची स्विमिंग, अनोख्या आंदोलनाची घुग्गुसमध्ये चर्चा

Ghuggus pothole protest

Ghuggus pothole protest : घुग्घूस (चंद्रपूर) ३० सप्टेंबर २०२५ : चंद्रपूर-पुणे राज्य महामार्ग (MSH-7) वरील घुग्घूस शहरातील राजीव रतन चौकाजवळ रेल्वे पुलाचे काम सुरू असलेल्या रस्त्यावर पडलेल्या महाकाय खड्ड्यांविरोधात आज, मंगळवार (दि. 30 सप्टेंबर) रोजी दुपारी 12 वाजता शहर काँग्रेसने अभिनव पद्धतीने आंदोलन केले. शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजुरेड्डी आणि कामगार नेते सैय्यद अनवर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्ये चक्क झोपून आणि पोहण्याचा अभिनय करत प्रशासनाचा निषेध केला.

चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

प्रशासनाची धावपळ, तातडीने रस्ते दुरुस्तीचे आश्वासन

या अनोख्या आंदोलनामुळे प्रशासनाची तात्काळ तारांबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संबंधित विभागांशी चर्चा करून तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले. पोलीस निरीक्षकांनी प्रशासनाच्या वतीने खड्डे बुजविण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर काँग्रेसने आपले आंदोलन मागे घेतले. Ghuggus road repair demand

नागरिकांची जीवघेणी गैरसोय

चंद्रपूर घुग्घूस राज्य महामार्ग (MSH – 7) हा चंद्रपूर-पुणे महामार्ग आहे. घुग्घूस शहरातून जाणाऱ्या या रस्त्यावर रेल्वे पुलाच्या कामामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचल्यामुळे हे खड्डे अधिक धोकादायक झाले आहेत. वेकोलीच्या रामनगर, सुभाष नगर, गांधी नगर, शास्त्री नगर, इंदिरा नगर, शालिकराम नगर, आंबेडकर नगर सह अनेक वसाहतीतील नागरिक तसेच यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांना या खड्ड्यांमुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे.

या खड्ड्यांमध्ये पडून अनेक दुचाकीस्वारांचे अपघात झाले असून, चिखलामुळे नागरिकांचे कपडे आणि शरीर खराब होत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात होता. याच संतप्त भावनांना वाट करून देण्यासाठी काँग्रेसने हे अभिनव आंदोलन केले.

आंदोलकांची प्रमुख मागणी

काँग्रेस नेत्यांनी रस्ते कर (रोड टॅक्स) भरणाऱ्या नागरिकांना साधा चालण्यायोग्य रस्ताही न देऊ शकणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) अधिकारी, महारेलचे अधिकारी आणि आर. के. मदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. PWD negligence pothole protest

‘तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजविले नाहीत, तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा’ काँग्रेसने प्रशासनाला दिला आहे.

यावेळी ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, जिल्हा सचिव अजय उपाध्ये, जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, शहर कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के यांच्यासह संध्या मंडल, जोया शेख, रोहित डाकूर, सुनील पाटील, दिपक पेंदोर, शहशाह शेख, निखिल पुनघंटी, अरविंद चहांदे, कपील गोगला, अनवर सिद्दीकी आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment