Ladki Bahin e-KYC Maharashtra
Ladki Bahin e-KYC Maharashtra : चंद्रपूर २२ सप्टेंबर २०२५ – ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरीता https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसी ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ही प्रक्रिया मोबाईलवरूनही सोप्या पद्धतीने करता येईल. तसेच पुढील दोन महिन्यात लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. या प्रक्रियेमुळे भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बचत गटाच्या मासिक सभेत सिमेंट रेलिंग कोसळली, ३ महिला जखमी
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य-पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनातर्फे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) द्वारे आर्थिक सहाय्य दिले जाते. महिला व बाल विकास विभागाकडून ई-केवायसी माध्यमातून लाभार्थीचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, महिला स्वतःच्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया पूर्ण करू शकतील, अशी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. लाभार्थीनी गोंधळून न जाता तसेच कोणीही आर्थिक मागणी करीत असेल त्यास बळी पडू नये असे आवाहनही मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
अशी आहे प्रक्रिया
: https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर KYC फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे. यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही. जर आधीच पूर्ण झाली असेल, तर ‘e-KYC आधीच पूर्ण झाली आहे’ असा संदेश दिसेल. Official Ladki Bahin e-KYC portal
जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल. जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल. यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा. संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटनावर क्लिक करावा. त्यानंतर लाभार्थ्याला आपला प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित कराव्या लागतील.
1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
2. माझ्या कुटुंबातील केवळ 1 विवाहित आणि 1 अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे. शेवटी, ‘Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे’ असा संदेश दिसेल, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी कळविले आहे.
