प्रचारादरम्यान झाला हल्ला
Warora bjp candidate attack वरोरा, चंद्रपूर | गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०२५ | (News34) – वरोरा येथील प्रभाग क्रमांक ५ मधून नगरसेवक पदासाठी उभे असलेले भारतीय जनता पक्षाचे (BJP) उमेदवार अनिकेत धनराज नाकाडे (वय ३५) यांच्यावर गुरुवारी, २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला. अचानक उद्भवलेल्या शाब्दिक वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
हे वाचा : चंद्रपुरात कालबाह्य औषधे खुलेआम जाळली, गुन्हा दाखल करा – राजेश बेले
तिघांनी हल्ला करीत केली मारहाण
भाजप उमेदवार अनिकेत नाकाडे दुपारी सुमारे ४:३० वाजता आपल्या समर्थकांसह दत्त मंदिर वार्डात प्रचार करत होते. यादरम्यान शुभम टोरे आणि अनिकेत नाकाडे यांच्यात अश्लील शिवीगाळ झाल्यामुळे वाद झाला. काही वेळातच शुभम टोरेने आपल्या सहकारी अमोल मडावी आणि गोलू मडावी यांसह नाकाडे यांच्यावर हल्ला करून जबर मारहाण केली. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपींनी नाकाडे यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न देखील केला. या हल्ल्यात नाकाडे यांना दुखापत झाली. Warora bjp candidate attack
या प्रकरणी भाजप उमेदवार नाकाडे यांनी मारहाण बाबत वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे, तक्रार प्राप्त होताच वरोरा पोलिसांनी कारवाई करीत तिघांना अटक केली आहे. आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी भाजप तर्फे करण्यात आली आहे.
वरोरा नगरपरिषद निवडणूक आता चुरशीची झाली असून सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार प्रचारात गुंतले आहे, अश्यातच असे प्रसंग घडणे हे सर्वच उमेदवारासाठी नुकसानदायक आहे.
