Amma Ki Padhai success : चंद्रपूर १६ डिसेंबर २०२५ (News३४) – गरजू विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अंधार दूर करून त्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा, आशेचा आणि यशाचा प्रकाश पसरवणे, यापेक्षा मोठे समाधान दुसरे नाही. अम्मा की पढाई हा केवळ शिक्षणाचा उपक्रम नाही, तर तो असंख्य विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आधार, त्यांच्या स्वप्नांचा विश्वास आणि समाजाच्या उज्ज्वल उद्याचा पाया आहे. या उपक्रमातून घडलेले अनेक विद्यार्थी आज शासकीय सेवेत विविध पदांवर कार्यरत होत असून हीच या उपक्रमाची खरी स्वप्नपूर्ती असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. (चंद्रपूर मनपा निवडणूक कार्यक्रम, आयुक्त कनुरी यांची पत्रकार परिषद)
अम्मा की पढाई या उपक्रमात शिक्षण घेत असलेल्या सचिन रामदास लाकडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य कर निरीक्षक या प्रतिष्ठित पदावर निवड झाली आहे. आज अम्मा की पढाई केंद्रात त्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला गोंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. विजय आईंचवार, माजी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, अम्मा की पढाई संस्थेचे उपाध्यक्ष संजय बेले, भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, माजी महापौर अंजली घोटेकर, महामंत्री सविता दंढारे, मनोज पाल, दशरथसिंह ठाकूर, अजय जयस्वाल, अरुण तिखे, सुमित बेले, राकेश नाकाडे, राज्य कर निरीक्षक निलेश मालेकर, मुग्धा खाडे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. Amma Ki Padhai success
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, शैक्षणिक गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे अनेक हुशार, कर्तबगार आणि स्वप्न पाहणार्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार शिक्षण घेता येत नाही, ही वास्तवाची वेदनादायी बाजू सातत्याने मनाला बोचत होती. हीच व्यथा, हीच जाणीव ठेवून अम्मा की पढाई नावाचा उपक्रम सुरू करण्याची संकल्पना जन्माला आली. शिक्षणाच्या प्रवाहापासून कुणीही केवळ पैशाअभावी दूर राहू नये, प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला पुढे जाण्याची संधी मिळावी, हा या उपक्रमामागचा प्रामाणिक हेतू होता.
हा उपक्रम सुरू करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विद्यार्थी येतील का, त्यांचा विश्वास आपण जिंकू शकू का, त्यांना खरोखरच दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण येथे देता येईल का, असे अनेक प्रश्न मनात सतत घोळत होते. आर्थिक मर्यादा, साधनसामग्रीचा अभाव, मार्गदर्शकांची उपलब्धता यांसारख्या अनेक अडथळ्यांमधून हा उपक्रम उभा राहिला. मात्र समाजाची सहकार्याची भावना आणि विद्यार्थ्यांवरील विश्वास यामुळे ही वाटचाल सुरू राहिली.
आज अम्मा की पढाई उपक्रमाअंतर्गत सध्या तब्बल 284 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. केवळ शिक्षणच नव्हे तर आत्मविश्वास, स्वप्न पाहण्याची हिंमत आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा येथे विद्यार्थ्यांना मिळत आहे. आजचा हा क्षण माझ्यासाठी आणि आपणा सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा, आनंदाचा आणि प्रेरणादायी आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने सुरू असलेल्या अम्मा की पढाई या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमातील विद्यार्थी सचिन रामदास लाकडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य कर निरीक्षक या प्रतिष्ठित पदावर निवड मिळवली आहे. हे यश केवळ सचिनचे नाही, तर त्यांच्या कुटुंबाचे, त्यांच्या मार्गदर्शकांचे आणि या उपक्रमाशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीचे असून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरू केलेला उपक्रम यशस्वी ठरत असल्याचा आनंद होत आहे.
सचिनसारखा सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशाची शिखरे गाठतो, तेव्हा खऱ्या अर्थाने समाजाच्या प्रगतीची जाणीव होते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी, योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास कोणताही विद्यार्थी आपले स्वप्न साकार करू शकतो, हे सचिनने सिद्ध करून दाखवले असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी अम्मा की पढाई केंद्रातील विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती होती.
