BJP Election Loss : चंद्रपूर २१ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – राज्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पार्टी पहिल्या क्रमांकावर आला पण चंद्रपूर जिल्ह्यात भाजपची चांगलीच पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. कांग्रेस ने १० नगरपरिषद पैकी ७ नगरपरिषदेवर सत्ता काबीज केली, भाजप १, शिंदेसेना १ व अपक्ष १ सोबतच नवनिर्मित भिसी नगरपंचायतीवर भाजपला यश मिळाले. (भाजप बंडखोराने आमदाराला दिले आव्हान)
भाजपच्या या पराभवावर माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले कि कांग्रेस नेत्यांना त्यांच्या पक्षाने शक्ती दिली मात्र माझ्या पक्षाने माझी शक्ती कमी केली. आमच्या पक्षात प्रवेश करणाऱ्यांसाठी दारे खुली करण्यात आली मात्र आता त्यावर सुद्धा चिंतन करण्याची वेळी आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भाजप पक्षात प्रथम गटबाजीला पोषक वातावरण तयार झाले होते. जनतेचा कौल आम्ही स्वीकारतो. मुनगंटीवार यांच्या या वक्तव्याचा हंसराज अहिर यांनी समाचार घेत मंत्री पद नसेल तर निवडणुकीत विजय मिळणार नाही का हा चुकीचा समज आहे. कांग्रेसच्या गडाला भाजपने उध्वस्त केले होते. हे विसरता कामा नये.
राजुरा विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात लढलेल्या राजुरा व गडचांदूर नगरपरिषदेत कांग्रेस व अपक्षाने बाजी मारली, भोंगळे यांच्या नेतृत्वाला जनतेने नाकारले, भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात नवनिर्मित घुग्गुस नगरपरिषदेची निवडणूक लढविल्या गेली. आमदार जोरगेवार यांच्या नेतृत्वातील हा पहिली निवडणूक होती, मात्र या निवडणुकीत कांग्रेस पक्षाने बाजी मारली. भाजपचे दिग्गज नेते माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रातील बल्लारपूर व मूल नगरपरिषदेवर कांग्रेसने कब्जा केला. तसेच पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आलेले वरोरा विधानसभा क्षेत्रातील भाजप आमदार करण देवतळे यांच्या विधानसभा क्षेत्रात कांग्रेस व शिंदेसेना ने बाजी मारली.
कांग्रेस पक्षाने आमदार वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात निवडणूक लढविली होती. भाजपमध्ये केवळ एकाच आमदाराने यश प्राप्त केले. चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी चिमूर नगरपरिषद व भिसी नगरपंचायतीवर विजय प्राप्त केला. चंद्रपूर जिल्ह्यातील दिग्गज भाजप नेत्यांना निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. विशेष बाब म्हणजे जिल्ह्यात ६ पैकी ५ आमदार भाजपचे आहे. ४ आमदार नगरपरिषदेच्या निवडणुकीत अपयशी तर १ आमदाराला यश प्राप्त झाले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर व आमदार विजय वडेट्टीवार या निवडणुकीत पास झाले. BJP Election Loss
भाजपच्या पराभवाचे कारण?
नगरपरिषद निवडणूक साठी अनेकांनी उमेदवारी अर्ज भाजपकडे दाखल केले होते, निष्ठावंतांना तिकीट न देता बाहेरून आलेल्याना तिकीट देण्यात आले, त्यामुळे बंडखोरांनी भाजपला जागा दाखवली. हा प्रकार गडचांदूर, राजुरा, भद्रावती मध्ये बघायला मिळाला. अनेक वर्षे भाजपात काम करणाऱ्या निष्ठावंतांनी भाजपची साथ सोडत कांग्रेसवासी झाले होते.
कांग्रेस पक्षावर जनतेचा विश्वास – खासदार धानोरकर
माझ्या लोकसभा क्षेत्रातील विशेषता चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षावर जनतेने विश्वास दाखविला असून विकास, पारदर्शकता आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने वाटचाल करण्याची मोठी जबाबदारी सोपविली आहे. हा निकाल म्हणजे सरकारविरोधी जनाधार आहे.
काँग्रेसच्या माध्यमातून विकासाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे ध्येय आम्ही ठामपणे बांधले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या नावाखाली केवळ भ्रष्टाचार केला. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून स्वार्थी राजकारण केले. त्यामुळेच मतदारांनी लोकशाही मार्गाने त्यांना योग्य जागा दाखवली आहे.
हा विजय जनतेच्या अपेक्षांचा आणि परिवर्तनाच्या इच्छेचा कौल आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण, समावेशक आणि शाश्वत विकास साधण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, हीच ग्वाही देत पुन्हा एकदा सर्व मतदारांचे आभार मानते. BJP Election Loss
भद्रावती नगरपरिषद शिवसेनेची तर गडचांदूरात अपक्ष
विशेष बाब म्हणजे शिवसेना उबाठा मधून शिंदेसेनेत गेलेले मुकेश जीवतोडे हे किंगमेकर ठरले असून त्यांनी भाजप व कांग्रेस पक्षाला धोबीपछाड देत शिवसेना शिंदे चा नगराध्यक्ष निवडून आणला. गडचांदूर नगरपरिषदेत भाजपचे बंडखोर निलेश ताजने यांनी प्रस्थापित पक्षांना धडक देत नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकत नग्रेसवकही निवडून आणले.
नगरपरिषद व नगरपंचायत निकाल
भद्रावती – (शिंदेसेना नगराध्यक्ष प्रफुल चटकी), शिंदेसेना १२, कांग्रेस ६ , भाजपा २, शिवसेना ठाकरे – २, बसपा – १, वंचित बहुजन आघाडी – ४, राष्ट्रवादी शरद पवार – १ व अपक्ष १.
वरोरा – (अर्चना ठाकरे कांग्रेस नगराध्यक्ष) – भाजप ११, कांग्रेस १०, शिंदेसेना २, अजित पवार १, उबाठा १, अपक्ष १
घुग्गुस – (दीप्ती सोनटक्के कांग्रेस नगराध्यक्ष), भाजप ७, कांग्रेस ११, अजित पवार २ , अपक्ष २
राजुरा – (नगराध्यक्ष अरुण धोटे, कांग्रेस) भाजप ४ , कांग्रेस १६, अपक्ष १
गडचांदूर – (निलेश ताजने अपक्ष नगराध्यक्ष) भाजप ८, कांग्रेस ६, उबाठा १, अपक्ष ५,
चिमूर – (गीता लिंगायत भाजप नगराध्यक्ष) भाजप १४, कांग्रेस ४, अपक्ष २,
ब्रह्मपुरी – (योगेश निसार नगराध्यक्ष कांग्रेस) भाजप १, कांग्रेस २१, अजित पवार १
नागभीड – (स्मिता खापर्डे नगराध्यक्ष कांग्रेस) भाजप ६, कांग्रेस १३, अपक्ष १
मूल – (एकता समर्थ कांग्रेस नगराध्यक्ष) कांग्रेस १८, भाजप २,
भिसी (अतुल पारवे भाजप नगराध्यक्ष)- भाजप ८, कांग्रेस ७, अपक्ष २
बल्लारपूर (अल्का वाढई कांग्रेस नगराध्यक्ष) – कांग्रेस १७, भाजप ७, अजित पवार – ३, शिवसेना ठाकरे ५, शिंदेसेना १, अपक्ष १
