Chandrapur Deadly Car Crash : चंद्रपूर २५ डिसेंबर २०२५ (Author प्रकाश हांडे) :- नात्यांच्या बंधनाची गरज आणि आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी निघालेला प्रवास अखेर मृत्यूत रूपांतरित झाला. नागपूरहून परतताना राजुरा तहसीलमधील सोन्डो गावाजवळ कार नाल्यात कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात आई-मुलीसह चार जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. या घटनेने संपूर्ण परिसरात हादरून गेला. (चंद्रपुरात महाविकास आघाडी मध्ये जागावाटपावरून बिघाडी)
तेलंगाणा राज्यातील आसिफाबाद जिल्ह्यातील कागजनगर येथील रहिवासी सलमा बेगम (वय ४५), त्यांची मुलगी अक्सा शबरीन (वय १२), नातेवाईक अफजल बेगम (वय ६०) आणि साहीरा बेगम (वय ४२) हे २४ डिसेंबर रोजी आजारी नातेवाईक यास्मीन बानो यांना भेटण्यासाठी नागपूरला गेले होते. त्यांच्यासोबत नुसरत बेगम, नजहत बेगम, शाहीन निशा, सात वर्षीय अब्दुल अरमान आणि चालक अब्दुल रहमान हेही कारमध्ये बसले होते.
२५ डिसेंबरच्या रात्री अंदाजे साडेबारा वाजता राजुरा तालुक्यातील सोन्डो गावाजवळ नाल्यातील पुलावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वेगवान आणि निष्काळजीपणामुळे मारुती सुजुकी एर्टिगा कार क्रमांक TS-02-EN-5544 थेट पुलावरून खाली नाल्यात कोसळली. Chandrapur Deadly Car Crash
कार कोसळण्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, राजुरा येथील शासकीय रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सलमा बेगम, अक्सा शबरीन, अफजल बेगम आणि साहीरा बेगम यांचा मृत्यू झाला रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या नुसरत बेगम, नजहत बेगम, शाहीन निशा, अब्दुल अरमान आणि चालक अब्दुल रहमान यांना पुढील उपचारांसाठी चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेबाबत मृत सलमा बेगम यांचा मुलगा मोहम्मद अनास हुसैन याने राजुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीत चालकाच्या निष्काळजी मुळे हा अपघात घडला असे कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. राजुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलिस निरीक्षक सुमित परतेकि यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पराग उल्लेवार करीत आहेत.
