घुग्घूस नगरपरिषद निकाल: काँग्रेस जिंकली, पण भाजपला राजकीय फायदा

Changing Voter Trends : घुग्गुस २१ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) राजकारणात काही पराभव असे असतात, जे आकड्यांनी हरलेले असले तरी भविष्याची दिशा ठरवून जातात. घुग्घूस नगर परिषद निवडणुकीचा निकाल हाच असा एक निकाल आहे. कागदोपत्री काँग्रेसने नगराध्यक्ष पद राखून ठेवले असले, तरी राजकीय वास्तव पाहता भाजपने घुग्घूसमध्ये निर्णायक मुसंडी मारली आहे.

घुग्घूस हे शहर वर्षानुवर्षे काँग्रेसचे बालेकिल्ले मानले गेले. दलित, मुस्लिम आणि ख्रीचन बहुल मतदारसंरचना असलेल्या या शहरात भाजपला पूर्वी पाच हजार मतांचा टप्पा गाठणेही कठीण होते. अशा पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवाराला ६ हजार ८५० मते मिळणे आणि अवघ्या ३४६ मतांनी पराभव पत्करणे, हे केवळ आकडेवारीतील चढउतार नाहीत, तर मतदारांच्या मनोवृत्तीतील बदलाचे स्पष्ट संकेत आहेत.

या निवडणुकीतील लढत ही परंपरा विरुद्ध परिवर्तन अशी होती. काँग्रेसला आजही पारंपरिक मतदारांचे पाठबळ लाभले, मात्र त्या पाठबळाला नव्या विश्वासाची जोड मिळालेली दिसली नाही. उलट भाजपने विकास, पायाभूत सुविधा, नागरी प्रश्न आणि प्रशासनातील पारदर्शकता या मुद्द्यांवर निवडणूक लढवत, आपली स्वीकारार्हता मोठ्या प्रमाणात वाढवली. Changing Voter Trends

यामध्ये आमदार किशोर जोरगेवार यांची भूमिका निर्णायक ठरली. घुग्घूस ही जागा भाजपसाठी अवघड आहे, हे ओळखून त्यांनी निवडणूक सहजतेने घेतली नाही. प्रचाराच्या अंतिम टप्प्यापर्यंत घुग्घूसमध्ये ठाण मांडून त्यांनी थेट मतदारांशी संवाद साधला. कॉर्नर बैठका, पदयात्रा आणि घराघरांत जाऊन विकासकामांचा लेखाजोखा मांडण्याची रणनीती भाजपसाठी फायदेशीर ठरली.

महत्त्वाची बाब म्हणजे, भाजपला मिळालेली मते ही केवळ एका समाजघटकापुरती मर्यादित राहिली नाहीत. विविध प्रभागांतून मिळालेला प्रतिसाद दर्शवतो की भाजपचा मतदारवर्ग आता विस्तारत आहे. हा बदल काँग्रेससाठी धोक्याची घंटा ठरू शकतो.
काँग्रेसचा विजय हा आज तरी सत्तेचा आहे, पण भाजपची वाढ ही भविष्यातील सत्तेची बीजे पेरणारी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येच पक्षांची खरी सामाजिक पकड तपासली जाते. त्या कसोटीवर भाजपने घुग्घूसमध्ये स्वतःला गंभीर पर्याय म्हणून सिद्ध केले आहे.

एकूणच, घुग्घूसचा निकाल हा भाजपसाठी पराभव नसून एक राजकीय टप्पा आहे. काही निवडणुका जिंकल्या जातात, तर काही निवडणुका पक्ष घडवतात. घुग्घूसमध्ये भाजपने निवडणूक हरली असली, तरी राजकीय भूमी मात्र निश्चितच जिंकली आहे. आणि हीच बाब भविष्यातील राजकारणात निर्णायक ठरू शकते.

Leave a Comment