Ghugghus municipal election घुग्गुस १९ डिसेंबर २०२५ (News३४) – उद्या शनिवारी घुग्घूस नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून प्रचाराच्या अंतिम दिवशी आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार देवराव भोंगळे यांनी घुग्घूस शहरात जोरदार प्रचार केला. शहरातील विविध प्रभागांमध्ये कॉर्नर बैठका, पदयात्रा, गाठीभेटी घेत नागरिकांशी थेट संवाद साधत भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. (भाजप प्रवेशावरून संदीप गिर्हे व निलेश बेलखेडे आमनेसामने)
घुग्घूस नगर परिषद निवडणुकीत ११ प्रभागांसह नगराध्यक्ष पदासाठी उद्या मतदान होणार आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून शारदा उर्फ पूजा दुर्गम यांच्यासह एकूण २२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्घूसमध्ये प्रचाराची धुरा स्वतः हाती घेतली आहे.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आमदार जोरगेवार यांनी पदयात्रा काढत प्रत्येक वॉर्डात नागरिकांशी संवाद साधला. घराघरात जाऊन मतदारांना भेटी देत भाजपच्या विकासकामांची माहिती दिली. घुग्घूस शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी सक्षम, पारदर्शक आणि विकासाभिमुख पर्याय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या सभांमध्ये आमदार देवराव भोंगळे यांनीही नागरिकांना संबोधित केले. केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकास योजना, नगर परिषदेत पारदर्शक प्रशासन, पायाभूत सुविधा, पाणी, रस्ते, आरोग्य व स्वच्छता यासाठी भाजपच्या उमेदवारांना संधी देण्याचे आवाहन करण्यात आले. Ghugghus municipal election
यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, उद्या होणारी ही नगर परिषद निवडणूक केवळ नगरसेवक किंवा नगराध्यक्ष निवडण्यापुरती मर्यादित नाही, तर घुग्घूसच्या भवितव्याचा निर्णय करणारी निवडणूक आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय जनता पार्टीने केंद्रात आणि राज्यात विकासाची नवी दिशा दिली आहे. त्याच धर्तीवर घुग्घूस शहराचाही सर्वांगीण विकास करण्यासाठी सक्षम नेतृत्व आवश्यक आहे. भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार हे स्वच्छ प्रतिमेचे, जनतेशी जोडलेले आणि काम करण्याची इच्छाशक्ती असलेले आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, स्वच्छता, रोजगार आणि शहराच्या मूलभूत सुविधांसाठी हे उमेदवार कटिबद्ध आहेत. नगर परिषदेत मजबूत भाजप नेतृत्व आले तर विकासकामांना गती मिळेल, असे ते यावेळी म्हणाले.
