illegal kidney trade : चंद्रपूर २० डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथुर गावातल्या रोशन कुडे यांनी १ लक्ष रुपयाचे कर्ज फेडण्यासाठी तब्बल ४८ लक्ष रुपये सावकारांना दिले मात्र त्यानंतरही सावकारांचा जाच न थांबल्याने शेतकरी रोशन कुडे ला बाहेर देशात जाऊन ८ लक्ष रुपयांना स्वतःची किडनी विकावी लागल्याचे प्रकरण सध्या राज्यात गाजले आहे. याप्रकरणी चंद्रपूर पोलिसांनी विशेष तपास पथक नेमलं आहे. (सावकाराचा फास, शेतकऱ्याने विकली किडनी)
चंद्रपूर पोलिसांच्या विशेष तपास पथकाचे नेतृत्व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे करीत असून यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे व सायबर पोलीस निरीक्षक सुनील गाडे, पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले सह २ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
वर्ष २०२१ मध्ये गाईच्या उपचाराकरिता रोशन कुडे यांनी सावकार सावकार मनीष घाटबांधे यांच्याकडून १ लक्ष रुपये व्याजाने घेतले होते, पण पैसे वेळेवर परत न दिल्याने सावकाराने रोशन कुडे ला मारहाण केली. सावकारांचा जाच सतत सुरु होता एकाचे कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घ्यायचे असा प्रकार सुरु होता. विशेष बाब म्हणजे सावकाराच्या टोळीने आपसातील सावकाराकडून कर्ज घे आणि आमचे कर्ज फेड असे सुचविले मात्र पैसे फेडताना कर्जाचा डोंगर मोठा झाला. शेती विकली, बँकेतील पैसे, दुचाकी वाहन सर्व विकले मात्र सावकाराचे व्याज काही कमी होईना. कर्ज लवकर फेड अन्यथा स्वतःची किडनी विक असा सल्ला सावकाराने रोशन ला दिला. illegal kidney trade
त्यानंतर रोशन ने चेन्नई मधील डॉ. क्रिष्णा यांच्याशी संपर्क साधत किडनीचा सौदा केला. रोशन कोलकाता मध्ये पोहोचला, रोशन ची वैद्यकीय तपासणी झाली व त्यानंतर कोलकाता वरून थेट कंबोडिया या देशात नेत ऑक्टोबर २०२४ रोजी किडनी काढण्यात आली. याचे रोशन ला ८ लक्ष रुपये मिळाले. पैसे सावकाराला दिल्यावर सुद्धा कर्जाची रक्कम काही कमी झाली नाही अखेर सावकाराच्या जाचाला कंटाळून रोशन ने पोलिसात तक्रार दिली. आणि हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी या प्रकरणी सावकार किशोर बावनकुळे, लक्ष्मण उरकुडे, प्रदीप बावनकुळे, संजय बल्लारपुरे, सत्यवान बोरकर या पाच जणांना अटक केली आहे, सावकार मनीष घाटबांधे हे अद्यापही फरार आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी घेतली रोशन ची भेट
२० डिसेंबर रोजी शेतकरी नेते प्रहार चे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी रोशन ची भेट घेतली, पोलिसांनी या प्रकरणी घेतलेली दखल हि समाधानकारक आहे मात्र रोशन ची मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार व आमदारांनी साधी विचारपूस हि केली नाही, लाज वाटली पाहिजे पुढाऱ्यांना आम्ही याठिकाणी राजकारण करायला आलो नाही, विदर्भातले मुख्यमंत्री असताना सुद्धा साधा फोन सुद्धा त्यांनी केला नाही. या अन्यायाविरोधात ३ जानेवारीला मिंथुर ते नागभीड पर्यंत लॉंगमार्च काढत शासनाने यावर न्याय द्यावा अशी मागणी लॉंगमार्च द्वारे करणार असे सांगितले. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहे अजून किती नागरिक शेतकरी यांची किडनी काढल्या गेली असेल याचा तपास होणे आवश्यक आहे. सोबतच या गुन्ह्यात मानव तस्करी व अवयव तस्करीचे गुन्हे दाखल व्हायला हवे. पूर्वी शेतकरी कर्ज फेडण्यासाठी शेती विकायचा आता किडनी विकण्याची वेळ आली आहे. शासनाचे विकासाचे स्वरूप यामाध्यमातून बदलत आहे. विशेष बाब म्हणजे या सावकारांमध्ये भाजप पदाधिकारी व कांग्रेसचा पदाधिकारी सुद्धा सहभागी आहे.
रोशन च्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अशोक उईके, स्थानिक खासदार, विरोधी पक्षाचे आमदार विजय वडेट्टीवार, का आले नाही असा प्रश्नही कडू यांनी उपस्थित केला.
आम्ही ६ जण सोबत – रोशन कुडे
कंबोडिया मध्ये जात असताना कोलकाता विमानतळावर बांगलादेश चे ७ जण, राजस्थान, पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तरप्रदेश प्रत्येकी १ व महाराष्ट्रातील दोघे असे ७ जण आम्ही जाण्यासाठी निघालो मात्र राज्यातील नाशिक जिल्यातील तरुण हा विमानतळावरून परत गेला, कंबोडिया मध्ये पोहोचल्यावर एकाचे रक्तगट न जुळल्याने त्याला परत पाठविण्यात आले. किडनीच्या बदल्यात आम्हाला ८ लक्ष रुपये मिळाले. सध्या रोशन मोलमजुरी करीत कुटुंबाचे पालनपोषण करीत आहे, याला हातभार त्याचा भाऊ लावत आहे.
२ दिवसात आरोपीना अटक होणार
या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी मधील अधिकाऱ्याने माहिती दिली कि आमचे पथक तपासासाठी बाहेर राज्यात गेले आहे, या प्रकरणाचा छडा लवकर लागणार असून दोन दिवसात आम्ही आरोपीला अटक करीत या सर्व रॅकेटचा उलगडा करणार आहोत.
