illegal loan lenders : चंद्रपूर, दि. १९ डिसेंबर २०२५ (News३४) : महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 नुसार सावकारी करण्यासाठी शासनाकडून वैध परवाना आवश्यक आहे. परवाना नसलेले सावकारांकडून जास्त व्याज आकारणे, कर्जदारास धमकी, मानसिक किंवा शारीरिक छळ, मालमता जप्ती, बळजबरीने कागदांवर सही करून घेणे हे सर्व प्रकार बेकायदेशीर असून असा व्यवसाय करणारे सावकार हे शिक्षेस पात्र आहेत. (सावकारीचा जाच, कर्ज फेडण्यासाठी युवकाने विकली किडनी)
त्यामुळे आपण अशा छळास बळी पडत असाल तर घाबरू नका, कोणत्याही दबावाला बळी पडू नका, कोरे कागद, धनादेश किंवा दस्तऐवजांवर स्वाक्षरी करू नका, जास्त व्याज व बेकायदेशीर वसुली मान्य करू नका. याबाबत त्वरीत तक्रार करा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
येथे करा तक्रार : जिल्हा हेल्पलाईन क्र. 18002338691 वर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर, सहाय्यक निबंधक, सहकार विभाग, उप निबंधक, सहकार विभाग, जवळचे पोलिस ठाणे येथे आपण तक्रार दाखल करू शकतो. आपली तक्रार गोपनीय ठेवण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुर, आदिवासी बांधव, महिला, ज्येष्ठ नागरिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी वरील ठिकाणी तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
