चंद्रपूरात 28 महाआरती, आरोग्य शिबिरे, रक्तदान; आमदारांचा अनोखा वाढदिवस

Kishor Jorgewar Birthday : चंद्रपूर १७ डिसेंबर २०२५ (News३४) : आजचा हा दिवस माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि कृतज्ञतेचा आहे. वाढदिवस हा वैयक्तिक आनंदाचा क्षण असतो; मात्र तो समाजासाठी काहीतरी करण्याचा संकल्प घेण्याचा दिवस ठरावा, अशी माझी नेहमीच भावना राहिली आहे. यावर्षीही माझा वाढदिवस केवळ शुभेच्छा, हार किंवा सत्कारापुरता मर्यादित न ठेवता आपण समाजोपयोगी आणि लोकहिताच्या विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला. हे माझ्यावर असलेल्या तुमच्या प्रेमाचे आणि सामाजिक जाणिवेचे प्रतिबिंब असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. (कर्ज फेडण्यासाठी त्याने थेट किडनीच विकली)

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, धार्मिक व क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, गुलदस्ता नको, पुस्तके द्या. कारण पुस्तक हे केवळ भेटवस्तू नसून ते ज्ञानाचे भांडार आहे, विचारांची दिशा देणारे साधन आहे आणि अनेक पिढ्यांचे भविष्य घडवणारी खरी संपत्ती आहे. आज एखाद्या गरजू विद्यार्थ्याच्या हातात पुस्तक दिले, तर उद्या त्याच विद्यार्थ्याच्या हातून समाज घडवण्याचे काम घडेल, हा माझा ठाम विश्वास आहे.

आमदार जोरगेवार यांच्या वाढदिवशी विविध उपक्रम

या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात 28 ठिकाणी महाआरती, चार ठिकाणी बुद्धवंदना, पाच ठिकाणी भजन-कीर्तन, 14 आरोग्य शिबिरे, योग शिबिरे, अन्नदान, फळ वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, गरजूंना वस्त्र व धान्य वाटप, रोजगार मेळावा, सामाजिक सन्मान सोहळे, रक्तदान शिबिरे, लाडू तुला अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. धर्म, संस्कार आणि सेवा या तीन मूल्यांवर समाज उभा राहतो. म्हणूनच धार्मिक कार्यक्रमांसोबतच आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवले जात आहेत. हा वाढदिवस माझा असला, तरी त्याचा आनंद समाजाच्या चेहऱ्यावर दिसावा, हीच खरी इच्छा आहे. शुभेच्छुकांकडून येणारी पुस्तके वाचनालयात देण्यात येणार असून ती पुस्तके अनेक गरजू विद्यार्थ्यांच्या ज्ञानप्रवासाला दिशा देतील, याचा मला विशेष आनंद आहे. हा छोटासा प्रयत्न मोठ्या सामाजिक परिवर्तनाची सुरुवात ठरू शकतो. Kishor Jorgewar Birthday

माझ्यावर प्रेम करणाऱ्या, मला मार्गदर्शन करणाऱ्या, सातत्याने पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक चंद्रपूरकर नागरिकाचे मी मनःपूर्वक आभार मानतो. तुमचा विश्वास, तुमचा पाठिंबा आणि तुमचे आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे. या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आणि सदैव जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरतर्फे 2026 दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच गांधी चौक येथील भारतीय जनता पक्षाच्या नूतन कार्यालयाचे पूजनही आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते संपन्न झाले. येथे प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. दीक्षाभूमी, काळाराम मंदिर, दर्गाह यांसह विविध धार्मिक स्थळी भेट देत आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रार्थना केली.

Leave a Comment