Tiger attack on farmer : गोंडपिपरी २२ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) : चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून आता ग्रामीण भागातील नागरिक शेतात जायला घाबरत आहे. २१ डिसेंबर ला शेतात पिकाची राखण करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला.
गोंडपिपरी तालुक्यात पुन्हा एकदा वाघाची दहशत निर्माण झाली असून गोजोली येथे वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाल्याची घटना घडली आहे. तालुक्यात विविध ठिकाणी सातत्याने वाघाच्या हालचाली वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष बाब म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत मानव वन्यजीव संघर्षात तब्बल ४५ नागरिकांचा बळी गेला आहे. (चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा आतंक, एकाच दिवशी दोघांची शिकार)
गोजोली येथील शेतकरी चक्रधर मोहुर्ले (वय ३९) हे (दि.२१)रात्री १० वाजताच्या सुमारास शेतातील पिकाची राखण करण्यासाठी गोजोली–डोंगरगाव शेत शिवारातील आपल्या शेतात गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात मोहुर्ले हे जखमी झाले.
जखमी शेतकऱ्याला तातडीने गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू केला आहे. Tiger attack on farmer
दरम्यान, गोंडपिपरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाघाच्या हालचाली वाढल्या असून शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना राबवाव्यात,व जखमी ला तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
