उमेद कर्मचाऱ्यांना दिलासा? खासदार धानोरकरांची केंद्रीय मंत्र्यासोबत सकारात्मक चर्चा

Umed Employees Maharashtra : चंद्रपूर १७ डिसेंबर २०२५ (News३४) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील (उमेद) हजारो कर्मचाऱ्यांच्या आणि ८४ लाख ग्रामीण कुटुंबांच्या भवितव्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्ली येथे केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली. ‘उमेद’मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शोषण थांबवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खासदारांनी थेट केंद्रीय स्तरावर हा प्रश्न मांडला असून, यावर सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले आहे. (सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी युवकाने विकली किडनी)

उमेद अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय समकक्ष पदांचा दर्जा मिळावा आणि या अभियानाला स्वतंत्र विभागाची मान्यता द्यावी, ही मुख्य मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी लावून धरली. मार्च २०२६ नंतर समुदाय संसाधन व्यक्तींचे मानधन शासनाकडून बंद करून ते लोकसंचलित संस्थांमार्फत देण्याचा जो निर्णय झाला आहे, तो रद्द करण्याची विनंती त्यांनी केली. तसेच, आशा स्वयंसेविकांप्रमाणेच ‘उमेद’च्या कर्मचाऱ्यांना १० लाख रुपयांचे विमा संरक्षण लागू करावे आणि ग्रामस्तरावरील महिलांना ‘ग्राम सखी’ म्हणून अधिकृत ओळखपत्र द्यावे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या भेटीदरम्यान खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारातील अनियमितता, प्रलंबित पदोन्नती आणि बदली प्रक्रिया यांसारख्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणींची माहिती मंत्र्यांना दिली. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेतल्या आणि ८४ लाख कुटुंबांच्या हितासाठी केंद्र सरकार यावर नक्कीच सकारात्मक तोडगा काढेल, असे आश्वासन दिले. खासदारांच्या या आक्रमक पाठपुराव्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या उमेद कर्मचाऱ्यांमध्ये आता आशेचा किरण निर्माण झाले आहे. 

Leave a Comment