Congress suspension news : चंद्रपूर १२ जानेवारी – चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना कांग्रेसने पक्षातील ७ जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे. उमेदवारी न मिळाल्याने निलंबित सदस्यांनी पक्ष शिस्तीचा भंग व बंडखोरी केली. असे पत्र महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस पक्षातर्फे जारी करण्यात आले आहे. (चंद्रपूर शहराची भाजपने वाट लावली – खासदार धानोरकर)
महानगरपालिका निवडणुकीत माजी नगरसेवक व कांग्रेस माजी अध्यक्ष नंदू नागरकर, माजी नगरसेवक प्रशांत दानव, सकीना अन्सारी, विना खनके, स्वप्नील चिवंडे, रवी भिसे व छबूताई पोहनकर यांनी बंडखोरी व कांग्रेस उमेदवारांच्या विरोधात प्रचार केल्याने त्यांना कांग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
तिकीट वाटप करताना कांग्रेस पक्षाने तरुणांना संधी दिली आहे, यामुळे अनेक माजी नगरसेवकांचे तिकीट कापल्या गेले. कांग्रेस पक्षाने मनपा निवडणुकीत नवं तरुणांना संधी देत एक प्रकारचा राजकीय जुगार खेळला अशी चर्चा जनमानसात आहे.
ऐन मनपा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठा निर्णय घेत बंडखोरांना घरचा रस्ता या कारवाईमुळे दाखविला आहे. पक्षाने दिलेल्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध बंडखोरी करणे, पक्षाच्या विरोधात प्रचार करणे आणि पक्ष शिस्तीचे उल्लंघन करणे यासारख्या गंभीर बाबी या पदाधिकाऱ्यांकडून घडल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर, संघटनेची शिस्त अबाधित राखण्यासाठी ही कठोर पावले उचलण्यात आल्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
