ब्रम्हपुरी: Brahmapuri ACB Trap प्रकरणामुळे ब्रम्हपुरी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात मोठी खळबळ उडाली आहे. प्रोत्साहन भत्ता बिल मंजूर करून दिल्याच्या मोबदल्यात 5 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तालुका समूह संघटक सुदेश ज्ञानेश्वर महाडोळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. एसीबीच्या सापळा कारवाईनंतर आरोग्य विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या कारवाईची जिल्हाभर चर्चा सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक मोठी कारवाई केली असून, कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या एका तालुका समूह संघटकाला ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. सुदेश ज्ञानेश्वर महाडोळे (वय ४० वर्षे, रा. ब्रम्हपुरी) असे लाचखोर शासकीय कर्मचाऱ्याचे नाव असून, या कारवाईमुळे आरोग्य विभागात आणि प्रशासकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे. (बाबुपेठ जुनोना चौकात अवैध दारूविक्री)
या प्रकरणातील तक्रारदार हे आरोग्य विभागात कार्यरत असून, त्यांना त्यांचे काम करण्याच्या मोबदल्यात शासनाकडून दरमहा १० हजार रुपये मानधन मिळते. तक्रारदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात माता व बालआरोग्य सेवा, लसीकरण, साथीचे व संसर्गजन्य आजार नियंत्रण आणि विविध बैठका यांसारखी महत्त्वाची कामे केली होती. या सर्व कामांचे मिळून आलेले प्रोत्साहन भत्ता बिल तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, ब्रम्हपुरी यांच्याकडून मंजूर होऊन ९ मे २०२६ रोजी तक्रारदार यांच्या पोस्टाच्या खात्यामध्ये एकूण ३३ हजार ६३१ रुपये जमा झाले होते. या पार्श्वभूमीवर, आरोपी तालुका समूह संघटक सुदेश महाडोळे याने हे प्रोत्साहन भत्ता बिल आपणच अंतिम तपासणी करून पुढे पाठवल्यामुळे मंजूर झाले आहे, असा दावा तक्रारदाराकडे केला आणि या कामाचा मोबदला म्हणून ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
Brahmapuri ACB Trap मध्ये समूह संघटकाला रंगेहात अटक
परंतु, तक्रारदार यांची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्यामुळे त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर यांच्याकडे या संदर्भात रीतसर तक्रार नोंदवली. तक्रारदाराच्या अर्जावरून एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, आरोपी सुदेश महाडोळे याने बिलाच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज, १० जून २०२६ रोजी एसीबीने तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात सापळा रचला आणि तक्रारदाराकडून लाचेची ५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना आरोपी सुदेश महाडोळे याला पंचांसमक्ष रंगेहात ताब्यात घेतले.
सदरची यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार, पोलीस निरीक्षक सचिन धर्मेजवार, तसेच सापळा पथकातील पोलीस हवालदार हिवराज नेवारे, रविकुमार इंगळे, पोलीस शिपाई अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदीप ताडाम, महिला पोलीस शिपाई मेघा मोहुर्ले, चालक पोलीस शिपाई सतीश सिडाम आणि संदीप कौरासे यांनी पार पाडली. या कारवाईनंतर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी जर कोणी अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने एखादा खाजगी एजंट कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असेल, तर नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर यांच्याशी त्वरित संपर्क साधावा.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






