Drone Pilot Training : चंद्रपूर – महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी अमृत संस्थेच्यावतीने ड्रोन ऑपरेटर रिमोट पायलट प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे. (वाघाच्या हल्ल्यात महिला ठार)
शेती क्षेत्रापासून फोटोग्राफीपर्यंत विविध क्षेत्रांतील कामे अचूक आणि उत्तम पद्धतीने करण्यासाठी आज ड्रोनचा वापर केला जातो. ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात; मात्र अमृत योजनेअंतर्गत हे प्रशिक्षण चक्क मोफत दिले जाते. एवढेच नव्हे, तर प्रशिक्षणानंतर ड्रोन उडवण्याचा अधिकृत परवानाही दिला जातो.
चंद्रपूरमध्ये अमृत संस्थेकडून मोफत Drone Pilot Training
हे प्रशिक्षण अत्यंत दर्जेदार असून 10 दिवसांचा निवासी कोर्स अमृत संस्थेकडून लक्ष्यित घटकांसाठी मोफत राबवला जातो. ड्रोन ऑपरेटर (पायलट) प्रशिक्षण कार्यक्रमामुळे युवकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी खुल्या होत आहेत. ड्रोनच्या वापराची क्षेत्रे आज विस्तारली असून, शेती फवारणी, पीक सर्वेक्षण, भूमापन (सर्व्हे), व्हिडिओग्राफी व फोटोग्राफी, सरकारी प्रकल्प निरीक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये ड्रोनचा प्रभावी वापर केला जातो. त्यामुळे या क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. हे नेमके ओळखून अमृत संस्थेने ड्रोन मिशनची सुरुवात केली. महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांना, विशेषतः ग्रामीण क्षेत्रात स्वयंरोजगार व रोजगार निर्मिती करणारे प्रशिक्षण देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. Drone Pilot Training
कोण करू शकतो अर्ज : खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा 25 जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घेऊ शकतात.
पात्रता : 1) उमेदवार हा वर दिलेल्या लक्ष्यित गटातील आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 2) त्याचे वय 18 ते 55वर्षांदरम्यान असावे. 3) उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असावा. 4) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. 5) शेतकरी कुटुंबातील उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. Drone Pilot Training
येथे करा संपर्क : या योजनेविषयीची सविस्तर माहितीसाठी अमृत चंद्रपूर जिल्हा कार्यालय, कृष्णा टॉवर जवळ, गुरुद्वारा रोड तुकूम. अधिक माहितीसाठी विक्रममोहन पांडे , मो. 9112228774 किंवा मेल आयडी amrut.chandrapurdm@gmail.com वर संपर्क करावा, असे जिल्हा व्यवस्थापक श्री. पांडे यांनी कळविले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now
