Chandrapur Cyber Fraud प्रकरणातील आरोपीला पुण्यातून अटक

“Loan Sanction Letter पाठवून लाखोंचा गंडा; चंद्रपूर सायबर पोलिसांची पुण्यात धडक कारवाई!”

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 19, 2026

चंद्रपूर: Chandrapur Cyber Fraud प्रकरणात चंद्रपूर सायबर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. फायनान्स कंपनीच्या नावाने बनावट कर्ज मंजुरी पत्रे तयार करून लाखो रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय भामट्याला पुण्यातून अटक करण्यात आली. आरोपीने विविध बनावट नावे वापरून महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये अनेकांना गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे. सायबर पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे हा मोठा फसवणूक रॅकेट उघडकीस आला आहे. (१६०० मीटर वीज तयार चोरला, २४ तासात पोलिसांनी पकडलं)

फायनान्स कंपनीच्या नावाने बनावट कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय भामट्याला चंद्रपूर सायबर पोलिसांनी अत्यंत शिताफीने पुण्यातून अटक केली आहे. विनोद शांताराम गडाख पाटील (वय ४४ वर्षे, रा. बाणेर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो वेगवेगळी नावे धारण करून अनेक राज्यांमध्ये लोकांना गंडा घालत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Chandrapur Cyber Fraud मध्ये नेमकी फसवणूक कशी झाली?

या प्रकरणाची सविस्तर हकीकत अशी की, बाबुपेठ, चंद्रपूर येथील तक्रारदार हे हार्वेस्टर मशीन विक्रेते आहेत. त्यांच्या काही ग्राहकांना हार्वेस्टर खरेदीसाठी कर्जाची आवश्यकता असल्याने, ग्राहकांमार्फत त्यांचा संपर्क हेमंत जोशी नामक व्यक्तीशी झाला. या व्यक्तीने स्वतःला ‘पुनावाला फिनकॉर्प लि. नागपूर’ चा कर्मचारी असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्याने ग्राहकांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्यासोबत कर्जाचे खोटे एग्रीमेंट केले. त्यानंतर तक्रारदाराच्या व्हॉट्सॲपवर १५,००,०००/- (पंधरा लाख) रुपयांचे बनावट कर्ज मंजुरी पत्र (Loan Sanction Letter) पाठवून कर्ज मंजूर झाल्याचा बनाव रचला.

कर्जाची रक्कम खात्यात जमा करण्यासाठी डाऊन पेमेंट म्हणून ४,४६,२५०/- रुपये ‘वृषभ ईखार, जनरल मॅनेजर, पुनावाला फिनकॉर्प लि.’ या नावाच्या बँक खात्यावर जमा करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार तक्रारदाराने १६ मे २०२६ रोजी आपल्या मोबाईलमधील बँकिंग ॲपद्वारे (IMPS) सदर रक्कम आरोपीच्या खात्यावर वर्ग केली. रक्कम जमा झाल्यानंतर आरोपीने १८ मे २०२६ रोजी कर्ज वितरण व मशीन डिलिव्हरीची खोटी मंजुरी पत्रे आणि वाहन डिलिव्हरीचा मेल पाठवला, मात्र १९ मे २०२६ पासून आरोपीचा मोबाईल क्रमांक बंद येऊ लागला.

संशय आल्याने तक्रारदाराने पुनावाला फिनकॉर्प लि. नागपूरच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली असता, ‘हेमंत जोशी’ नावाचा कोणताही कर्मचारी तिथे कार्यरत नसल्याचे आणि सर्व कागदपत्रे पूर्णपणे बनावट असल्याचे उघड झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने सायबर हेल्पलाईन ‘१९३०’ वर ऑनलाईन तक्रार नोंदवली आणि चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. यावरून ३ जून २०२६ रोजी आयटी ॲक्ट आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यांनी या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस स्टेशनकडे वर्ग केला. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अवघ्या काही दिवसांतच आरोपीचा शोध घेतला. आरोपी पुणे येथील मोहन नगर, बाणेर भागातील ‘लक्झर को-ऑपरेटिव्ह सोसायटी’मधील एका फ्लॅटमध्ये राहत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर चंद्रपूर सायबर पोलिसांनी तेथे धाड टाकून मोठ्या शिताफीने त्याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली.

प्राथमिक तपासात आरोपी विनोद पाटील हा अत्यंत सराईत ठग असल्याचे समोर आले असून, त्याने नाशिक (महाराष्ट्र), लखनऊ (उत्तर प्रदेश), इंदोर (मध्य प्रदेश) आणि वडोदरा (गुजरात) या ठिकाणी सुद्धा स्वतःचे नाव बदलून लोकांची फसवणूक केल्याचे दिसून आले आहे. तो वेळोवेळी हेमंत जोशी, हेमंत पवार, रणवीर सिंग सिकरवार, राम हरी चंद, मयंकर वानखेडे, अभिषेक शर्मा, जितेंद्र श्रीवास्तव, निखिल यादव आणि विठ्ठल पाटील अशा विविध बनावट नावांचा वापर करून लोकांना जाळ्यात ओढत होता. न्यायालयाने आरोपीची ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली असून, गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस अत्यंत गांभीर्याने करत आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगिरी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. सुनील गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. नीलेश गिरी, श्री. बलराम झाडोकर आणि सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर तसेच चंद्रपूर शहर व बावधन (पुणे) येथील पोलीस अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या फोन किंवा व्हॉट्सॲपवरील कर्ज मंजुरीच्या आमिषाला बळी पडू नका आणि अधिकृत बँकेत किंवा फायनान्स कंपनीत स्वतः जाऊन खात्री केल्याशिवाय कोणत्याही बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर करू नका. तसेच ऑनलाईन फसवणूक झाल्यास त्वरित राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन नंबर १९३० वर संपर्क साधावा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment