बल्लारशाह: Ballarshah Liquor Seizure प्रकरणात वर्धा रेल्वे पोलीस दलाने मोठी कारवाई करत बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून अवैध दारू वाहतूक करणाऱ्या एका पुरुषासह महिलेला अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत आरोपींकडून १६,२५० रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली. राप्तीसागर एक्सप्रेसच्या जनरल डब्याजवळ संशयास्पद हालचाली करताना दोघांना पकडण्यात आले असून या प्रकरणी वर्धा रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुप्त माहिती मिळताच एलसीबी चा छापा, ६५० ग्राम गांजा जप्त)
वर्धा रेल्वे पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बल्लारशाह रेल्वे दुरक्षेत्र (आउटपोस्ट) पथकाने एका धडक कारवाईत बल्लारशाह रेल्वे स्थानकावर अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या एका इसमासह महिलेला अटक केली आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १६,२५० रुपये किमतीची अवैध देशी दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी वर्धा रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ballarshah Liquor Seizure कारवाई कशी उघडकीस आली?
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, दिनांक १९ जून २०२६ रोजी सकाळी ७.३५ वाजताच्या सुमारास बल्लारशाह रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर फिर्यादी पोलीस अंमलदार दर्शन झाडे हे त्यांचे सहकारी पोलीस शिपाई ठाकरे आणि पोलीस शिपाई राजेंद्र फटिंग यांच्यासह कर्तव्यावर तैनात होते. दरम्यान, त्यांना गुप्त माहितीदाराकडून बातमी मिळाली की, प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर उभ्या असलेल्या ट्रेन नंबर १२५११ राप्ती सागर एक्सप्रेसच्या मागील जनरल कोचजवळ एक पुरुष आणि एक महिला आपल्या जवळील बॅग आणि पिशव्यांमध्ये बेकायदेशीरपणे दारू घेऊन जात आहेत. माहिती मिळताच पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन संशयास्पद स्थितीत दिसणाऱ्या त्या महिला व पुरुषाला ताब्यात घेतले.
दोन पंचांसमक्ष त्यांच्या जवळील बॅग आणि पिशव्यांची झडती घेतली असता, पोलिसांना त्यात मोठ्या प्रमाणात विनापरवाना व बेकायदेशीर विक्रीसाठी नेली जाणारी देशी दारू आढळून आली. यामध्ये आरोपी क्रमांक १ भरत लल्लाकुला ओदेलु लल्लाकुला (वय २६ वर्ष, रा. हाऊस नंबर ५-२-४८, पोस्ट ऑफिस बस्ती, आदिलाबाद, बेलमपल्ली, राज्य तेलंगणा) याच्या ताब्यातील बॅग आणि पिशवीतून ९० मि.ली. क्षमतेच्या ‘रॉकेट संत्रा’ देशी दारूच्या २०० सीलबंद बॉटल्स, ज्यांची एकूण किंमत ८,२२० रुपये आहे, जप्त करण्यात आल्या. तसेच आरोपी क्रमांक २ सत्तम्मा लक्काकुला (वय ५१ वर्ष, रा. हाऊस नंबर ५-२-४८, पोस्ट ऑफिस भरती, आदिलाबाद, राज्य तेलंगणा) हिच्या जवळील दोन वेगवेगळ्या पिशव्यांमधून त्याच कंपनीच्या २०० बॉटल्स, ज्यांची किंमत ८,०३० रुपये आहे, हस्तगत करण्यात आल्या. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून एकूण १६,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस अंमलदार दर्शन झाडे यांच्या लेखी फिर्यादीवरून वर्धा रेल्वे पोलीस ठाण्यात अप. क्र. १६१/२०२६, कलम ६५ (अ) आणि ६६ (ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी नियमानुसार सूचना पत्र दिले असून, वर्धा रेल्वे पोलीस ठाण्यांतर्गत बल्लारशाह आउटपोस्टचे पोलीस नाईक संजय सुखदेवे हे ई-साक्ष प्रणालीचा वापर करून या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करीत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






