Chandrapur Jivane Family – समृद्धी महामार्ग अपघातानंतर जीवने कुटुंबाला अखेरचा निरोप

एकाच चितेवर पाच जणांना मुखाग्नी, चंद्रपूरकरांना अश्रू अनावर

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 29, 2026

चंद्रपूर – (Chandrapur Jivane Family) समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात मृत्यू झालेल्या चंद्रपूरच्या जीवने कुटुंबातील पाच सदस्यांवर सोमवारी शांतीधाम स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच चितेवर पाचही पार्थिवांवर अंत्यसंस्कार होताच उपस्थित नागरिकांना अश्रू अनावर झाले. या घटनेने संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हळहळ व्यक्त करत असून जीवने कुटुंबाच्या आठवणींनी शहर भावूक झाले आहे. (बाबुपेठ मधील जीवने कुटुंब समृद्धी महामार्गावर संपल)

नियतीचा खेळ किती क्रूर असावा, याचा एक अत्यंत हृदय पिळवटून टाकणारा आणि विदारक प्रसंग चंद्रपूरकरांनी अनुभवला. समृद्धी महामार्गावर रविवारी झालेल्या भीषण अपघातात काळाच्या पडद्याआड गेलेल्या जीवने कुटुंबातील पाच निष्पाप सदस्यांना सोमवारी (ता. २९) चंद्रपुरातील शांतीधाम स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. एकाच सरणावर जेव्हा या पाचही जणांचे पार्थिव ठेवण्यात आले, तेव्हा उपस्थित असलेल्या प्रत्येकाचाच कंठ दाटून आला आणि अवघा जनसागर ओल्या डोळ्यांनी हेलावून गेला. (वाघाच्या हल्ल्यात युवक ठार)

Chandrapur Jivane Family प्रकरणाने चंद्रपूर का हादरले?

वेकोलितून सेवानिवृत्त झालेले बाबुपेठ येथील रहिवासी महादेव जीवने (६३) आणि त्यांची पत्नी लता जीवने (५६), तसेच भटाळी वेकोलित अधिकारी असलेला त्यांचा मुलगा भास्कर जीवने (४२), नुकतीच एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन अकोला येथे महिला व बालविकास विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून रुजू झालेली सून आरती जीवने (३७) आणि त्यांची अवघ्या १२ वर्षांची लाडकी नात त्रिशा, असं हे सुशिक्षित आणि सुखी कुटुंब होतं. आरती यांना त्यांच्या अकोल्याच्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी सोडण्यासाठी हे संपूर्ण कुटुंब रविवारी सकाळी मोठ्या आनंदाने कारने निघाले होते. परंतु, धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक १०६ जवळ उभ्या असलेल्या एका कंटेनरवर त्यांच्या कारची भीषण धडक बसली आणि काही क्षणातच या पाचही जणांचा प्रवास कायमचा थांबला.

सोमवारी दुपारी जेव्हा या पाचही जणांचे मृतदेह चंद्रपुरात आणण्यात आले, तेव्हा नातेवाईक आणि मित्रपरिवाराने केलेला आक्रोश काळजाचा थरकाप उडवणारा होता. तुकूम आणि बाबुपेठ येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवल्यानंतर, दुपारी ४ वाजताच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा निघाली. एकाच घरातून एकाच वेळी पाच जणांची अंत्ययात्रा निघताना पाहून संपूर्ण चंद्रपूर शहर सुन्न झाले होते. शांतीधाम स्मशानभूमीत एकाच चितेवर या पाचही जणांना रचण्यात आले आणि भास्कर जीवने यांच्या बहिणी व भाच्यांनी जड अंतःकरणाने त्यांना मुखाग्नी दिला. एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा असा अंत पाहून वेकोलि, जिल्हा परिषद आणि महिला व बालविकास विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह उपस्थित हजारो नागरिकांचे डोळे पाणावले होते.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment