चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी (Chandrapur Missing Children Case) अंतर्गत हरवलेल्या तसेच पळवून नेलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश आले आहे. सन २०२१ ते मे २०२६ या कालावधीत जिल्ह्यात एकूण १,१७६ मुला-मुलींच्या हरवण्याची नोंद झाली होती. त्यापैकी तब्बल १,१५५ बालकांचा यशस्वी शोध घेण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले आहे. सध्या केवळ २१ प्रकरणांमध्ये पोलिसांचे शोधकार्य वेगाने सुरू आहे. (भाजप नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल)
Chandrapur Missing Children Case : पोलिसांचे मोठे यश
चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी हरवलेल्या तसेच पळवून नेण्यात आलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. सन 2021 ते मे 2026 या कालावधीत जिल्ह्यात अशा एकूण 1,176 प्रकरणांची नोंद झाली असून त्यापैकी 1,155 बालकांचा यशस्वी शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सध्या केवळ 21 प्रकरणांमध्ये शोधकार्य सुरू असल्याची माहिती चंद्रपूर पोलिसांनी दिली आहे.
हरवलेल्या आणि पळवून नेलेल्या प्रत्येक बालकाचा शोध घेणे हे चंद्रपूर पोलिसांचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. राज्याचे पोलीस महासंचालक, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन शोध’ आणि ‘ऑपरेशन मुस्कान’ या मोहिमा प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या मोहिमांमध्ये TrackChild पोर्टल, CCTNS प्रणाली, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन तपास तसेच विविध राज्यांतील पोलिसांशी सातत्याने समन्वय साधून हरवलेल्या बालकांचा शोध घेण्याचे काम केले जात आहे.
हरवलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘मिसिंग सेल’ स्थापन करण्यात आला आहे. या सेलमार्फत माहिती संकलन, तांत्रिक तपास, विविध राज्यांतील पोलिसांशी समन्वय आणि आवश्यक तपासाची प्रक्रिया सातत्याने राबविली जाते. तसेच अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट (AHTU) च्या मदतीनेही शोधमोहीम अधिक प्रभावी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वर्षनिहाय आकडेवारीही नुसार 2021 मध्ये 226 पैकी 224, 2022 मध्ये 241 पैकी 240, 2023 मध्ये 232 पैकी 230, 2024 मध्ये 186 पैकी 182, 2025 मध्ये 196 पैकी 193 आणि मे 2026 पर्यंत 95 पैकी 86 बालकांचा शोध घेण्यात यश आले आहे. उर्वरित 21 प्रकरणांमध्ये पोलिसांचे शोधकार्य सुरू असून संबंधित बालकांचा शोध घेण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
बालके घरातून निघून जाण्याची प्रमुख कारणेही या प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आली आहेत. प्रेमसंबंध, सोशल मीडियाचा अतिवापर, ऑनलाइन मैत्रीमुळे फसवणूक, कौटुंबिक वाद, पालकांशी मतभेद, कुटुंबातील भांडणे आणि रागाच्या भरात घर सोडणे ही कारणे सर्वाधिक आढळून आल्याचे विश्लेषणातून समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या पाल्यांशी नियमित संवाद ठेवावा, त्यांच्या मित्रपरिवार, मोबाईल आणि सोशल मीडियावरील हालचालींवर लक्ष ठेवावे, मुलांच्या मानसिक अडचणी समजून घेऊन विश्वासाचे वातावरण निर्माण करावे आणि आवश्यकतेनुसार शिक्षक व पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन चंद्रपूर पोलिसांनी केले आहे.
याशिवाय ‘सुरक्षेचा मंत्र – आधुनिक जगात एक पाऊल पुढे’ या जनजागृती अभियानांतर्गत जिल्हाभरात 25 हजार जनजागृती पुस्तिकांचे वितरण करण्यात येत आहे. तसेच शाळा भेटी, पालक-शिक्षक बैठका, व्याख्याने, चित्रफिती आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून बालसुरक्षेबाबत व्यापक जनजागृती केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोणतेही बालक, महिला किंवा पुरुष हरवल्याची अथवा पळवून नेल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा आपत्कालीन क्रमांक 112 तसेच चाइल्ड हेल्पलाइन 1098 वर माहिती द्यावी, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी केले आहे. पोलिसांनी नागरिकांच्या सहकार्यामुळे अनेक बालकांना त्यांच्या कुटुंबापर्यंत सुखरूप पोहोचविणे शक्य झाले असून उर्वरित प्रकरणांमध्येही शोधकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






