चंद्रपूर : (Chandrapur Police Arrest) चंद्रपुरात रामनगर पोलिसांनी एका अत्यंत संवेदनशील प्रकरणातील फरार आरोपीला ९ वर्षांनंतर अटक केली आहे. हा आरोपी २०१७ पासून गडचिरोली पोलिसांना गुंगारा देत होता. अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात तो पसार झाला होता. गुप्त खबऱ्यांकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. कायद्याच्या हातापासून कुणीही वाचू शकत नाही, हे पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. (फेसबुक ओळख पडली महागात, राजुऱ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार)
Chandrapur Police Arrest : रामनगर पोलिसांची सर्वात मोठी कारवाई
तब्बल नऊ वर्षांपासून गडचिरोली पोलिसांच्या नजरेआड राहिलेला आणि विविध ठिकाणी ओळख लपवत वास्तव्य करणारा एका गंभीर गुन्ह्यातील पसार आरोपी अखेर रामनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या ताब्यात आला. गडचिरोली पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात शोधात असलेला हा आरोपी अनेक वर्षे पोलिसांना चकवा देत होता. मात्र, रामनगर पोलिसांच्या खबऱ्यांकडून मिळालेल्या अचूक माहितीमुळे त्याचा शोध लागला आणि नऊ वर्षांपासून सुरू असलेली पोलिसांची शोधमोहीम अखेर यशस्वी ठरली.
गडचिरोली पोलीस ठाण्यात वर्ष २०१७ मध्ये भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३ अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्या वेळी १६ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालक असलेला संजय मनोज मालकार उर्फ अंकित मनोज मालकार (सध्या वय २२, रा. बल्लारशाह, जि. चंद्रपूर) याचे नाव समोर आले होते. अल्पवयीन मुलीला रिमांड होममधून पळवून नेल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो पोलिसांच्या तावडीतून निसटला आणि तब्बल नऊ वर्षे फरार राहिला.
या काळात गडचिरोली पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी अनेक वेळा पथके रवाना केली. तत्कालीन तपासी अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून विविध ठिकाणी तपास केला. आरोपीचा माग काढण्यासाठी चंद्रपूर शहरातही वारंवार शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, आरोपी प्रत्येक वेळी आपले ठिकाण बदलत राहिल्याने किंवा ओळख लपवत राहत असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्यामुळे नऊ वर्षे हा आरोपी पोलिसांना सातत्याने गुंगारा देण्यात यशस्वी ठरला.
दरम्यान, रामनगर पोलिसांनी आपल्या खबऱ्यांचे जाळे अधिक मजबूत करत संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान संजय मालकार हा अंत्यविधीसाठी एका ठिकाणी आला असल्याची माहिती रामनगर पोलिसांच्या गुप्त बातमीदारांनी दिली. तसेच त्याने आपले नाव ‘संजय’ असे सांगितले असले तरी त्याच्या हातावर गोंदवलेले नाव आणि इतर ओळख पटविणाऱ्या खुणांमुळे पोलिसांना संशय आला.
माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी तात्काळ हालचाली करत गडचिरोली पोलिसांशी संपर्क साधला. दोन्ही जिल्ह्यांच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करून संशयिताची खातरजमा केली असता तोच नऊ वर्षांपासून फरार असलेला संजय मनोज मालकार उर्फ अंकित मालकार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी गडचिरोली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
तब्बल नऊ वर्षांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपीला अखेर अचूक गुप्त माहिती, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि दोन जिल्ह्यांच्या पोलिसांच्या समन्वयातून अटक करण्यात रामनगर पोलिसांना यश आले. या कारवाईमुळे जुन्या प्रलंबित गुन्ह्याचा छडा लागला असून, फरार आरोपी कितीही काळ लपून राहिला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक इंद्रकांत काकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागपे तसेच पोलीस हवालदार आनंद खुणत यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






