चंद्रपूर – महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने Maharashtra ATS Pakistan Gangster नेटवर्कविरोधात संपूर्ण राज्यात मोठी शोधमोहीम राबवली आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात सुमारे १० संशयितांची चौकशी करण्यात आली. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ३ तरुणांचा समावेश होता. या तिघांची एटीएसच्या विशेष पथकाने सखोल चौकशी केली. मात्र प्राथमिक तपासात कोणतीही आक्षेपार्ह बाब समोर न आल्याने त्यांना मुक्त करण्यात आले. (४७ घरफोड्या करणारा अट्टल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात)
Maharashtra ATS Pakistan Gangster मोहिमेअंतर्गत विदर्भात चौकशी
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र एटीएस ने राज्यभरात एकाचवेळी १५० हून अधिक ठिकाणी समन्वित छापेमारी मोहीम राबवली. या कारवाईचा उद्देश पाकिस्तानस्थित संशयित हँडलर्स आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कशी संबंधित डिजिटल दुव्यांचा शोध घेणे हा होता. या संपूर्ण कारवाईचा केंद्रबिंदू पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याचे कथित सोशल मीडिया आणि डिजिटल नेटवर्क असल्याचे सांगितले जात आहे.
सुरक्षा यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, दुबईतून कार्यरत असल्याचा संशय असलेला शहजाद भट्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय तरुणांशी संपर्क साधत असून, पैशांचे आमिष दाखवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता तपासली जात आहे. याच अनुषंगाने राज्यभरातील संशयित व्यक्तींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
या कारवाईचा भाग म्हणून शुक्रवारी एटीएसचे विशेष पथक चंद्रपुरात दाखल झाले. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने दुर्गापूर परिसरातील दोन आणि घुग्गुस येथील एका अशा २० ते २५ वर्षे वयोगटातील तीन तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांच्या मोबाईल फोन, लॅपटॉप तसेच अन्य डिजिटल उपकरणांची बारकाईने तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर काही कागदपत्रे आणि ऑनलाइन व्यवहारांचीही पडताळणी करण्यात आली.
दीर्घकाळ चाललेल्या चौकशीनंतर या तिघांविरोधात कोणतेही आक्षेपार्ह साहित्य, दहशतवादी संघटनांशी संबंध किंवा संशयास्पद डिजिटल व्यवहार आढळून आले नाहीत. त्यामुळे त्यांची चौकशी पूर्ण करून त्यांना मुक्त करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एटीएसकडून सुरू असलेल्या राज्यव्यापी कारवाईमुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून परदेशातून चालविल्या जाणाऱ्या संशयास्पद नेटवर्कवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. या कारवाईमुळे पूर्व विदर्भासह राज्यातील विविध भागांत खळबळ उडाली असून, तपास यंत्रणा पुढील धागेदोरे शोधण्यासाठी डिजिटल पुराव्यांची छाननी सुरू ठेवत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






