warora cyber fraud case

केंद्रीय अर्थमंत्र्यांचा बनावट व्हिडिओ आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची साडेनऊ लाखांची फसवणूक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 19, 2026

वरोरा: (warora cyber fraud case) अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून सायबर गुन्हेगारांनी एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकाला लक्ष्य केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावाचा वापर करून तयार केलेल्या बनावट व्हिडिओ रिल्सद्वारे फिर्यादीला ९ लाख ४६ हजार २२० रुपयांचा मोठा गंडा घालण्यात आला. बलवंत परशुराम घडले यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत आहेत. (हे हि वाचा – एक मॅसेज आणि तरुणाची १८ लाखांची फसवणूक)

warora cyber fraud case : सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची कष्टाची पुंजी लुटली

हा संपूर्ण फसवणुकीचा प्रकार १४ ऑक्टोबर २०२५ ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडला असून, आपले पैसे परत मिळतील या आशेवर असलेल्या फिर्यादीने अखेर १७ जुलै २०२६ रोजी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियम (आयटी ॲक्ट) २००० चे कलम ६६(क), ६६(ड) आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३१८(४) अन्वये गुन्हा नोंदवून सखोल तपासाला सुरुवात केली आहे.

या धक्कादायक सायबर गुन्ह्याची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, तक्रारदार बलवंत घडले हे शिक्षण विभागातून मुख्याध्यापक पदावरून मार्च २०२५ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी ते आपल्या ओपो कंपनीच्या अँड्रॉइड मोबाईलवर फेसबुक ॲप्लिकेशनवर रिल्स पाहत असताना, त्यांना भारताच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांची एक व्हिडिओ क्लिप दिसली. त्या व्हिडिओमध्ये २२ हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास महिन्याला ४० हजार ते ८० हजार रुपये नफा मिळेल, असे हिंदीत सांगितले जात होते आणि या योजनेचा मॅनेजर ‘अयाण प्रणव’ नावाचा इसम राहील अशी माहिती देण्यात आली होती.

या रिल्सला अधिकृत समजून फिर्यादीने त्या लिंकला स्पर्श केला असता ‘9 Pro.com’ नावाची एक वेबसाईट उघडली, ज्यावर त्यांनी आपली वैयक्तिक माहिती भरली. त्यानंतर लगेचच त्यांना अयाण प्रणव हा त्यांचा असिस्टंट मॅनेजर असल्याचे सांगण्यात आले आणि २२ हजार २० रुपये जॉइनिंग फी भरण्यास सांगण्यात आले. फिर्यादी घडले यांनी त्यांच्या पत्नीच्या मोबाईलमधील गुगल पे वरून ही रक्कम नवीनकुमार विधानी नावाच्या बँक खात्यात पाठवून दिली, जी नंतर इंडियन ओव्हरसीज बँकेच्या खात्यात जमा झाल्याचे समोर आले.

यानंतर संशयित आरोपी अयाण प्रणव याने वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून फिर्यादीशी संपर्क साधला आणि व्हॉट्सॲपवर गुंतवणुकीचे विविध प्लॅन्स पाठवून दिले, ज्यामध्ये डॉलरमध्ये गुंतवणूक केल्यास वार्षिक ८.९ टक्के दराने मोठा नफा मिळण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून फिर्यादीने २१ ऑक्टोबर २०२५ रोजी पुन्हा ४४ हजार २०० रुपये गुगल पे द्वारे ॲक्सिस बँकेच्या एका खात्यात पाठवले.

त्यानंतर आरोपीने व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या ‘एएस एंटरप्राइजेस’च्या एचडीएफसी बँकेच्या खात्यावर फिर्यादीने २७ ऑक्टोबर २०२५ रोजी थेट आपल्या खात्यावरून ८ लाख ८० हजार रुपयांची रक्कम आरटीजीएस (RTGS) द्वारे ट्रान्सफर केली, जी नंतर गुजरात मर्चंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खात्यात वर्ग झाली. आरोपीच्या सांगण्यावरून फिर्यादीने आपल्या मोबाईलमध्ये ‘9 Pro’ नावाचे ॲप्लिकेशन डाऊनलोड केले, ज्यामध्ये त्यांना एकूण ९ लाख ४६ हजार २२० रुपयांच्या गुंतवणुकीच्या मोबदल्यात १९ हजार ९८८ डॉलरची शिल्लक रक्कम जमा असल्याचे दिसत होते.

आपल्याला मोठा नफा झाल्याचा विश्वास बसल्याने फिर्यादी घडले यांनी १९ नोव्हेंबर २०२५ रोजी या ॲप्लिकेशनमधून ५,००० डॉलर म्हणजेच सुमारे साडेचार लाख रुपये काढण्यासाठी (विड्रॉल) विनंती पाठवली. मात्र, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच २० नोव्हेंबर २०२५ रोजी संबंधित कंपनीने हा विड्रॉल नाकारून फिर्यादीच्या खात्यातील संपूर्ण शिल्लक रक्कम थेट ‘शून्य’ दाखवली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने तातडीने २९ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टलवर आपली तक्रार नोंदवली.

सायबर तक्रारीनंतर आपले कष्टाचे पैसे परत मिळतील या आशेवर ते अनेक महिने वाट पाहत होते, मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी वरोरा पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दिली. वरोरा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक ओमप्रकाश शामराव सोनटक्के यांनी या संवेदनशील गुन्ह्याची नोंद केली असून, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे गुजरातच्या गांधीनगर परिसराशी संबंधित असलेल्या या अज्ञात सायबर भामट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक कार्यरत झाले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment