वरोरा – वरोरा लाचखोरी प्रकरण समोर आले आहे. बार अँड रेस्टॉरंटच्या बांधकामासाठी ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चंद्रपूर पथकाने केलेल्या सापळा कारवाईत ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग पेंदे आणि विस्तार अधिकारी प्रणव बक्षी यांना ताब्यात घेतले. एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदाराकडे सुरुवातीला ५ लाखांची मागणी झाली होती. नंतर तडजोडीअंती ३ लाखांवर सहमती झाली. ही कारवाई नोव्हेंबर २०२६ मध्ये करण्यात आली. (घुग्गुस मध्ये भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, वाचा बातमी)
वरोरा लाचखोरी प्रकरण नेमके काय आहे?
चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यात बार अँड रेस्टॉरंटच्या बांधकामासाठी ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात तब्बल ३ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), चंद्रपूरच्या पथकाने गुरुवारी (ता. ६ नोव्हेंबर) केलेल्या यशस्वी सापळा कारवाईत ग्रामपंचायत अधिकारी आणि पंचायत समितीचा विस्तार अधिकारी अशा दोन्ही राजपत्रित व शासकीय अधिकाऱ्यांना रंगेहाथ जेरबंद केले. पांडुरंग निलकंठ पेंदे (वय ४८, रा. ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय नागरी, ता. वरोरा) आणि प्रणव सुधाकर बक्षी (वय ५१, रा. विस्तार अधिकारी पंचायत, पंचायत समिती वरोरा) अशी जाळ्यात अडकलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची नावे आहेत.
वरोरा लाचखोरी प्रकरण, बार अँड रेस्टॉरंटच्या एनओसीसाठी ५ लाखांची मागणी
प्राप्त माहितीनुसार, ३७ वर्षीय तक्रारदार आणि त्यांच्या भावाच्या नावे असलेल्या शेतात बार अँड रेस्टॉरंटचे बांधकाम करायचे होते. या बांधकामासाठी ग्रामपंचायतीचे नाहरकत (एनओसी) प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक होते. हे प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग पेंदे याने स्वतःसाठी आणि आपले वरिष्ठ अधिकारी प्रणव बक्षी यांच्याकरिता ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचेची ही अवाढव्य रक्कम देण्याची अजिबात इच्छा नसल्यामुळे तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर कार्यालयात येऊन २ नोव्हेंबर २०२६ रोजी विहित तक्रार नोंदवली.
तडजोडीनंतर ३ लाखांवर सहमती; वरोरा लाचखोरी प्रकरण
तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन एसीबीच्या पथकाने दिनांक ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. वरोरा येथील आनंदवन चौक आणि नंतर पंचायत समिती कार्यालयात झालेल्या पडताळणीदरम्यान आरोपी पांडुरंग पेंदे व विस्तार अधिकारी प्रणव बक्षी यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीच्या ५ लाखांच्या मागणीवरून तडजोड करत ३ लाख रुपयांची लाच स्वीकारण्यास पंचांसमक्ष मान्यता दिली असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर गुरुवारी, दिनांक ६ नोव्हेंबर २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने पूर्वनियोजित सापळा रचला. ठरलेल्या पट्ट्यानुसार मौजा खांबाळा येथे पंचांसमक्ष आरोपी पांडुरंग पेंदे याने तक्रारदाराकडून ३ लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. लाचेची रक्कम हाताळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पेंदे आणि त्याचे वरिष्ठ अधिकारी प्रणव बक्षी या दोघांनाही तात्काळ ताब्यात घेतले.
वरोरा लाचखोरी प्रकरण; कारवाईत सहभागी एसीबी पथक
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी बाविस्कर व श्री. विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अनिल जिटट्टावार, पोलीस निरीक्षक तेजराम मेश्राम, पो.हवा. हिवराज नेवारे, रविकांत इंगळे, पो.शि. अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदिप ताडाम, महेश माहुरपवार, म.पो.शि. सिमा झाडे, चा.पो.शि. सतिश सिडाम आणि चा.पो.शि. संदिप कवरासे यांच्या पथकाने पार पाडली. वरोरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींना अटक करण्याची नोंद घेतली जात आहे. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, भ्रष्टाचारासंबंधित कोणतीही माहिती किंवा लाच मागणाऱ्या लोकसेवकांविषयी तक्रार असल्यास त्यांनी एसीबीच्या चंद्रपूर येथील कार्यालयाशी किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







