चंद्रपूर – चिमुकल्यांच्या हृदयशस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर चंद्रपुरातील अनेक कुटुंबांच्या घरात यंदा दिवाळीचा आनंद उजळला आहे. उपचार झालेल्या बालकांनी पालकांसह आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. सर्वांनी एकत्र फराळ करत दिवाळी साजरी केली. यावेळी कल्याणी किशोर जोरगेवार उपस्थित होत्या. आमदार कार्यालयाच्या माहितीनुसार, त्यांच्या पुढाकारातून आतापर्यंत जवळपास ३०० बालकांवर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्या मुंबईतील खासगी रुग्णालयांमध्ये करण्यात आल्या. (मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नका, नाव नोंदणी करा)
चिमुकल्यांच्या हृदयशस्त्रक्रिया: ३०० बालकांना नवे आयुष्य
दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि नव्या आशेचा सण. मात्र, ज्या घरांमध्ये चिमुकल्यांच्या हृदयविकारामुळे चिंतेचे सावट होते, त्या घरांमध्ये आज आनंदाचे दिवे उजळले आहेत. काही दिवसांपूर्वी आपल्या लहानग्यांच्या हृदयशस्त्रक्रियेच्या चिंतेने व्याकूळ असलेले पालक आज त्याच चिमुकल्यांना हसताना, खेळताना आणि आनंदाने दिवाळी साजरी करताना पाहत आहेत. या आनंदाला आणखी खास बनविण्यासाठी हृदयशस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या चिमुकल्यांनी आपल्या पालकांसह आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा केला यावेळी कल्याणी किशोर जोरगेवार या देखील उपस्थिती होत्या.
यावेळी चिमुकल्यांनी आणि त्यांच्या पालकांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आमदार जोरगेवार यांनीही सर्वांचे प्रेमाने स्वागत करत चिमुकल्यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सर्वांसोबत दिवाळीचा फराळ करत त्यांनी आनंदाचे क्षण अनुभवले. चिमुकल्यांच्या निरागस हास्याने आणि पालकांच्या चेहर्यावरील समाधानाने निवासस्थानातील वातावरण भावूक आणि आनंदमय झाले होते.
एक दिवसाच्या बाळापासून १७ वर्षांपर्यंत
विशेष म्हणजे, आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आतापर्यंत जवळपास ३०० चिमुकल्यांच्या हृदयशस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यात एक दिवसाच्या बाळापासून 17 वर्षाच्या मुलांचा समावेश आहे. हृदयविकारावरील या शस्त्रक्रिया अत्यंत खर्चिक असतात. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक पालकांना आपल्या मुलांवर योग्य उपचार करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत या कुटुंबांना आधार देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते. या शिबिरांमध्ये तपासणी करून हृदयशस्त्रक्रियेसाठी पात्र ठरणार्या बालकांच्या पुढील उपचारांची व्यवस्था केली जाते.
या बालकांवर मुंबई येथील खासगी रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या हृदयशस्त्रक्रिया करण्यात येतात. विशेष म्हणजे, केवळ शस्त्रक्रियेची व्यवस्था करून ही जबाबदारी संपत नाही, तर चिमुकल्यांसह त्यांच्या पालकांच्या मुंबईपर्यंतच्या जाण्या-येण्याची तसेच उपचाराच्या काळातील राहण्याची व्यवस्थाही आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने केली जाते. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहण्याची वेळ आलेल्या अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. जवळपास ३०० चिमुकल्यांच्या हृदयावर यशस्वी उपचार होऊन त्यांना नव्याने निरोगी आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे.
काही दिवसांपूर्वी याच चिमुकल्यांच्या हृदयशस्त्रक्रियेचा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठ्या चिंतेचा विषय होता. लहान वयातच हृदयविकाराचा सामना करणार्या मुलांच्या उपचारांचा खर्च, शस्त्रक्रियेची गुंतागुंत आणि त्यांच्या भविष्याची काळजी यामुळे पालक हतबल झाले होते. मात्र, आज त्याच चिमुकल्यांच्या चेहर्यावर फुललेले निरागस हास्य आणि त्यांच्या पालकांच्या चेहर्यावर दिसणारे समाधान पाहून या प्रयत्नांचे मोल अधोरेखित झाले.
एकीकडे काही दिवसांपूर्वी रुग्णालयातील उपचार, डॉक्टरांची धावपळ आणि शस्त्रक्रियेच्या यशाची चिंता होती, तर दुसरीकडे आज त्याच चिमुकल्यांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ज्या पालकांच्या डोळ्यांत आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता होती, त्याच पालकांच्या डोळ्यांत आज कृतज्ञतेचे आणि समाधानाचे भाव दिसत होते. या क्षणांनी आमदार किशोर जोरगेवारही भावूक झाले.
यावेळी भावना व्यक्त करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, काही दिवसांपूर्वी या चिमुकल्यांच्या हृदयशस्त्रक्रियेच्या चिंतेने त्यांचे पालक व्याकूळ होते. मात्र, आज त्याच चिमुकल्यांच्या चेहर्यावर फुललेले निरागस हास्य आणि त्यांच्या पालकांच्या चेहर्यावर दिसणारे समाधान पाहून मनाला विलक्षण आनंद मिळत आहे. एखाद्या कुटुंबाच्या आयुष्यातील दुःख दूर करून त्यांच्या जीवनात आनंदाचे रंग भरता येणे, यापेक्षा मोठे समाधान दुसरे कोणतेही नाही. या चिमुकल्यांना नव्याने आयुष्य जगण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या पालकांच्या चेहर्यावर पुन्हा हास्य फुलले, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी कमाई आहे. आज या चिमुकल्यांनी दिलेल्या दिवाळीच्या शुभेच्छा आणि त्यांच्या चेहर्यावरील आनंद हीच माझ्यासाठी अनमोल भेट आहे.
समाजकारण हे केवळ पद, प्रतिष्ठा किंवा राजकीय जबाबदारीपुरते मर्यादित नसून, गरजेच्या वेळी एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण बनणे, हेच खर्या अर्थाने लोकसेवेचे सार आहे. दिवाळीच्या प्रकाशपर्वात या चिमुकल्यांच्या आयुष्यात आरोग्याचा, आनंदाचा आणि नव्या भविष्याचा प्रकाश उजळला. त्यांच्या हास्यातून आणि पालकांच्या समाधानातून या उपक्रमाचे खरे यश दिसून आले.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







