चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये ‘पालकमंत्री हटाओ – चंद्रपूर बचाओ’ स्वाक्षरी अभियान राबविण्यात येणार आहे. २४ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२६ या कालावधीत शहरातील विविध ठिकाणी हे अभियान आयोजित केले जाईल. यासाठी पालकमंत्री हटाओ अभियान कृती समितीने चंद्रपूर शहर पोलिसांकडे अधिकृत निवेदन सादर करून परवानगीची मागणी केली आहे. (चंद्रपुरात गॅस रिफिलिंगचा काळाबाजार, वाचा बातमी)
पालकमंत्री हटाओ अभियान कृती समितीकडून स्वाक्षरी अभियान
पालकमंत्री हटाओ कृती समिती, चंद्रपूर यांच्या वतीने २४ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२६ या कालावधीत चंद्रपूर शहरातील विविध ठिकाणी “पालकमंत्री हटाओ – चंद्रपूर बचाओ” हे स्वाक्षरी अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांचा सहभाग नोंदवून लोकशाही आणि शांततापूर्ण मार्गाने स्वाक्षऱ्या संकलित केल्या जाणार आहेत. या अभियानाच्या आयोजनासाठी कृती समितीच्या वतीने चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे अधिकृत निवेदन सादर करून आवश्यक पोलीस परवानगीची मागणी करण्यात आली आहे.
नागरिक, व्यापारी आणि सामाजिक संघटनांना आवाहन
हे अभियान शहरातील विविध चौक आणि सार्वजनिक ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने राबविले जाणार आहे. या काळात वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही, याची विशेष दक्षता समितीकडून घेतली जाणार आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिक, व्यापारी, सामाजिक संघटना आणि विविध क्षेत्रांतील मंडळींनी सहभागी होऊन आपल्या स्वाक्षरीद्वारे लोकशाही मार्गाने भूमिका मांडावी, असे आवाहन कृती समितीने केले आहे.
पोलीस ठाण्यात निवेदन सादर करताना कुमार जनमलवार, विजय रामगिरकर, मिलिंद उपगनलवार, कुलदीपसिंग मिर्धा, महेश आखेवार, नितीन खोब्रागडे, मुन्ना भाऊ खोब्रागडे, आर. पिल चौधरी, संदेश सहारे, पवन मामीडवार, हरिश्चंद्र निब्राड आणि शारदाताई परिहार आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. “पालकमंत्री हटाओ – चंद्रपूर बचाओ” हा नागरिकांच्या भावनांना लोकशाही मार्गाने मांडण्याचा संकल्प असल्याचे संयोजक ललित ओमप्रकाश कासट यांनी कळविले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






