चंद्रपूर – पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत नोंदणीकृत संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राज्यातील अल्पसंख्यांक समाजातील इच्छुक उमेदवारांना निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्हा नियोजन अधिकारी भगवान पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्ज ३० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत सादर करायचे आहेत.
अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये राज्यातील मुस्लीम, ख्रिश्चन, बौध्द, शीख, जैन, ज्यु या अल्पसंख्यांक समाजातील इच्छुक उमेदवारांना निवासी पोलिस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक असलेल्या नोंदणीकृत संस्था/प्रशिक्षण संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. (नागभीड तालुक्यात भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, वाचा बातमी)
पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रमात काय असेल?
प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये खालील बाबींचा अंतर्भाव राहील : 1) जिल्हानिहाय निवडलेल्या किमान 25 व कमाल 50 प्रशिक्षणार्थीना निवासी पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षेसाठी प्रशिक्षण देणे. 2) सदर प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थी अंकगणित, सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी भाषा व शारिरीक क्षमता या विषयाचे प्रशिक्षण देऊन पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षेसाठी त्यांची तयारी करुन घेणे. 3) प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिन्यांचा निवासी स्वरुपाचा असणार आहे.4) प्रशिक्षणा संदर्भातील (प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षक यांचे) हजेरीपट, पत्रव्यवहार, अहवाल लेखे इत्यादी परिपूर्ण ठेवणे,
संस्थेच्या निवडीसाठीचे निकष : 1) प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्यामध्ये धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत असावी. 2) संस्थेला किमान 5 वर्षाचा शिकवणीचा किंवा प्रशिक्षणाचा अनुभव असावा.3) संस्थेकडे प्रशिक्षणार्थीना अंकगणित, सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी भाषा व शारिरीक क्षमता या विषयाचे प्रशिक्षण देण्यासाठी अनुभवी प्राध्यापक/प्रशिक्षक असणे (B.P.Ed पदवीधारक, शारीरिक प्रशिक्षक), वर्ग खोल्या (50 प्रशिक्षणार्थी साठी एक याप्रमाणे) उपलब्ध असणे, ग्रंथालय, वाचनालय, स्वच्छतागृहे आणि खेळाचे मैदान इत्यादी. सुविधा उपलब्ध असणे आवश्यक राहिल. 4) संस्थेकडे राहण्यासाठी पुरेशा खोल्या (50 प्रशिक्षणार्थीसाठी) स्वच्छ पिण्याचे पाणी, पुरेशा स्वच्छ स्वच्छतागृह, महिला उमेदवारांकरीता राहण्यासाठी स्वतंत्र खोल्या व स्वच्छतागृह, स्वतःच्या मालकीचे अथवा सार्वजनिक खेळाचे मैदान असणे आवश्यक आहे. 5)सदरचे प्रशिक्षण निवासी असल्यामुळे विद्यार्थांची /उमेदवारांची विशेषतः महिला उमेदवारांच्या सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी तसेच त्या अनुषंगाने आवश्यक ती उपाय योजना संस्थेने केलेली असणे आवश्यक आहे.
प्रशिक्षण संस्थांना किती अनुदान मिळणार? पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण
प्रशिक्षण संस्थांना देय प्रशिक्षण शुल्क : 17 डिसेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार निवड केलेल्या प्रशिक्षण संस्थेस 50 प्रशिक्षणार्थाच्या प्रशिक्षणाकरीता निवास व्यवस्था, अभ्यास साहित्य, शारिरिक आणि बौध्दीक प्रशिक्षण, अल्पोपहार, व भोजन तसेच गणवेश साहित्य इत्यादी करीता 12 लक्ष 2 हजार 500 रुपये एवढे अनुदान वितरीत करण्यात येइल. त्यापैकी प्रशिक्षण संस्थेने करारनामा करून प्रशिक्षण सुरू केल्यानंतर 50 टक्के प्रशिक्षण सुरू होऊन, दोन महिन्यानंतर 25 टक्के व प्रशिक्षणाणासाठी आलेले उमेदवार प्रत्यक्षात पोलीस भरतीच्या शारिरिक वा लेखी चाचणी परीक्षेत उपस्थितीत झाल्याचा पुरावा सादर केल्यानंतर 25 टक्के याप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत संबंधित प्रशिक्षण संस्थांना अनुदान अदा करण्यात येईल.
अर्ज करण्याची पध्दत : इच्छुक प्रशिक्षण संस्थानी आपले अर्ज अल्पसंख्यांक विकास विभाग शासन निर्णय 17 डिसेंबर 2021 मधील प्रपत्र अ प्रमाणे संस्थेच्या लेटरहेडवर टंकलिखीत करून सीलबंध लिफाफामध्ये बंद स्वरूपात संबंधित जिल्हयाचे जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी, अल्पसंख्यांक कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे सादर करावेत.
अर्जासोबत संस्थेच्या नोंदणीचा दाखला, संस्थेची नियमावली, शैक्षणिक प्रशिक्षण विषयक कामाचा अनुभव, संस्थेकडे उपलब्ध अनुभवी प्राध्यापक/प्रशिक्षक, मागील तीन वर्षाचे लेखापरिक्षण अहवाल, निवासाची व भोजनाची व्यवस्था, खेळाचे मैदान संस्थेचे मालकीचे आहे किंवा भाडेतत्वावर आहे. इत्यादी. बाबतच्या सविस्तर माहितीचे कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात. लिफाफाच्या वरच्या बाजुस ठळक अक्षरात पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षा निवासी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज असे लिहिलेले असावे.
इच्छुक प्रशिक्षण संस्थानी आपले अर्ज संबंधीत जिल्हाचे जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी, अल्पसंख्यांक कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे 30 नोव्हेंबर 2026 सायंकाळी 6:15 मिनिट पर्यंत सादर करावे, असे जिल्हा नियोजन अधिकारी भगवान पवार यांनी कळविले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






