रेल्वे स्थानकांचे नामकरण मागणी करणाऱ्या खासदार प्रतिभा धानोरकर

चंद्रपूर जिल्ह्यातील ३ रेल्वे स्थानकाचे नामकरण होणार, खासदार धानोरकर यांची मागणी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 23, 2026

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या तीन महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे नामकरण करून महापुरुषांच्या व समाजसुधारकांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यात यावा, अशी आग्रही मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून तात्काळ कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. (११ महिन्यात आरोग्य उपकेंद्राची इमारत पूर्ण, वाचा बातमी)

चंद्रपूर रेल्वे स्थानकाला भगवान बिरसा मुंडा यांचे नाव देण्याची मागणी, रेल्वे स्थानकांचे नामकरण

चंद्रपूर हा आदिवासी बहुल जिल्हा असून आदिवासी समाजाचे प्रेरणास्रोत व स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदानाची आणि शौर्याची गाथा आजही जिवंत असून आदिवासी बांधवांच्या अस्मितेचा व भावनांचा आदर राखून चंद्रपूर रेल्वे स्थानकाला ‘भगवान बिरसा मुंडा रेल्वे स्थानक’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच, कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे कर्मयोगी पद्मविभूषण स्वर्गीय बाबा आमटे यांनी वरोरा येथे ‘आनंदवन’ची स्थापना करून मानवतेचा नवा आदर्श जगासमोर ठेवला असून त्यांच्या महान सेवा कार्यामुळेच वरोरा शहराची जागतिक ओळख निर्माण झाली आहे; त्यामुळे कर्मयोगी बाबा आमटे यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी वरोरा रेल्वे स्थानकाचे नामकरण ‘कर्मयोगी पद्मविभूषण स्वर्गीय बाबा आमटे रेल्वे स्थानक’ असे करण्यात यावे.

यासोबतच, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र, राज्यसभेचे माजी उपसभापती तथा शोषित-पीडित, शेतकरी व कामगार जनतेचे नेते स्वर्गीय बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे चंद्रपूर जिल्ह्याच्या व विदर्भाच्या जडणघडणीत मोठे योगदान असून नुकतीच त्यांची जन्मशताब्दी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. त्यांच्या महान कार्याचा गौरव म्हणून बल्लारपूर रेल्वे जंक्शनला ‘बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जंक्शन’ असे नाव देण्यात यावे, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

समस्त चंद्रपूर जिल्हावासीयांची व विविध सामाजिक संघटनांची ही प्रदीर्घ काळापासूनची मागणी असून, ती पूर्ण झाल्यास या तिन्ही महापुरुषांच्या कार्याला खरी मानवंदना ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील जनतेच्या भावनांचा आदर राखून केंद्र व राज्य शासनाने संबंधित विभागाला योग्य ते आदेश देऊन तिन्ही स्थानकांच्या नामकरणाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment