चंद्रपूर: पोंभुर्णा आयटीआय लाच प्रकरणी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी (२३ नोव्हेंबर) सापळा रचून प्राचार्या कल्पना संजय खोब्रागडे आणि कनिष्ठ लिपिक नरेंद्र चंद्रशेखर मलीक यांना ताब्यात घेतले. तासिका तत्वावरील शिल्प निदेशकाचे पाच महिन्यांचे ७८ हजाराचे मानधन काढून देण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप आहे. (राजुऱ्यात घरफोडी, दागिने विकले वर्ध्यात, गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या))
एसीबीच्या पत्रकानुसार, तडजोडीअंती ठरलेली २५ हजार रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारताना लिपिकाला पकडण्यात आले. पोंभुर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), पोंभुर्णा येथील तासिका तत्वावरील शिल्प निदेशकाचे पाच महिन्यांचे मानधन काढून देण्याच्या मोबदल्यात लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चंद्रपूर पथकाने धडक सापळा रचून संस्थेच्या प्राचार्यासह कनिष्ठ लिपिकाला रंगेहात ताब्यात घेतले आहे. सोमवारी (ता. २३ नोव्हेंबर) करण्यात आलेल्या या कारवाईत तडजोडीअंती ठरलेली २५ हजार रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारताना लिपिकाला पकडण्यात आले असून, या प्रकरणी प्राचार्य आणि लिपिक अशा दोघांविरुद्ध पोंभुर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोंभुर्णा आयटीआय लाच प्रकरण: तक्रारदार महिलेचे आरोप काय?
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, तक्रारदार ३१ वर्षीय महिला या पोंभुर्णा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्वावर शिल्प निदेशक म्हणून कार्यरत आहेत. वायरमन विषयाच्या प्रात्यक्षिक आणि सैद्धांतिक तासिकांसाठी त्यांना ठरल्याप्रमाणे मानधन मिळते. मे, जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२६ अशा पाच महिन्यांचे एकत्रित मानधन नोव्हेंबर २०२६ मध्ये त्यांच्या खात्यात जमा झाले होते. हे पाच महिन्यांचे मानधन काढून दिल्याचा मोबदला म्हणून संस्थेच्या प्राचार्या कल्पना संजय खोब्रागडे (वय ५५, वर्ग-१) यांनी कनिष्ठ लिपिक नरेंद्र चंद्रशेखर मलीक (वय ४७, वर्ग-३) यांच्यामार्फत ३० हजार रुपयांची लाच मागितली होती.
पडताळणीत प्राचार्यांनी ३० हजारांची मागणी केल्याचा आरोप, पोंभुर्णा आयटीआय लाच प्रकरण
लाच देण्याची कोणतीही इच्छा नसल्याने तक्रारदार महिलेने २१ नोव्हेंबर २०२६ रोजी चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जाऊन लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत २२ नोव्हेंबर २०२६ रोजी पडताळणीची कार्यवाही राबवण्यात आली. पडताळणीदरम्यान पंचांच्या साक्षीने तक्रारदार महिलेला प्राचार्या कल्पना खोब्रागडे यांच्याकडे पाठवण्यात आले. त्यावेळी खोब्रागडे यांनी पाच महिन्यांचे ७८ हजारांचे मानधन काढून दिल्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची मागणी करत तडजोडीअंती २५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली आणि २३ नोव्हेंबर रोजी ही रक्कम पोंभुर्णा येथील आयटीआयमध्ये कनिष्ठ लिपिक नरेंद्र मलीक यांच्याकडे देण्यास सांगितले. तसेच लिपिक मलीक यांनीही प्राचार्यांच्या मागणीला प्रोत्साहन देत लाच स्वीकारण्याची तयारी दाखवली.
त्यानुसार २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक तेजराम मेश्राम आणि पर्यवेक्षक अधिकारी पोलीस उपअधीक्षक अनिल जिटट्टावार यांच्या नेतृत्वाखालील एसीबी पथकाने पोंभुर्णा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार महिलेने २५ हजार रुपयांची लाचेची रक्कम लिपिक नरेंद्र मलीक यांच्याकडे दिली. पंचासमक्ष मलीक यांनी ही रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने झडप घालून नरेंद्र मलीक आणि प्राचार्या कल्पना खोब्रागडे या दोघांना ताब्यात घेतले.
सध्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पोंभुर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुन्हा दाखल होताच दोघांच्या अटकेची औपचारिक नोंद करण्यात येणार असल्याचे एसीबीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि अपर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल जित्तावार यांच्या नेतृत्वात पार पडली असून, तपासाची पुढील कार्यवाही सुरू आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






