चंद्रपूर – वढा तीर्थक्षेत्र यात्रा कार्तिक पौर्णिमेनिमित्त वर्धा आणि पैनगंगा नद्यांच्या संगमावरील वढा येथे भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडली. या यात्रेनिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. आयोजकांनी त्यांचा सन्मान केला. वढा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ४४ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाल्याचे जोरगेवार यांनी सांगितले.
वढा तीर्थक्षेत्र यात्रा: कार्तिक पौर्णिमेला विठ्ठल दर्शन
विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्धा आणि पैनगंगा नद्यांच्या पवित्र संगमावर वसलेल्या श्री तीर्थक्षेत्र वढा येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त भक्तीमय वातावरणात यात्रा उत्साहात पार पडली. या यात्रेनिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी वढा येथे उपस्थिती लावत श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मनोभावे दर्शन घेतले. विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. यावेळी आयोजकांच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांचा सन्मान करण्यात आला. (भिवापुरातील हनुमान मंदिराचा विकास आराखडा तयार, वाचा सविस्तर)
यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, श्री तीर्थक्षेत्र वढा हे विदर्भातील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. वर्धा आणि पैनगंगा या दोन पवित्र नद्यांच्या संगमामुळे या तीर्थक्षेत्राला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कार्तिक पौर्णिमेसारख्या पवित्र पर्वावर येथे येऊन श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणीचे दर्शन घेतल्याने मनाला विशेष समाधान लाभते. अशा श्रद्धास्थानांचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व जपण्यासोबतच त्यांचा नियोजनबद्ध विकास करणेही तितकेच आवश्यक आहे. भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि या तीर्थक्षेत्राची ओळख राज्यासह देशभर पोहोचविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
वढा तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी ४४ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाला असून, ही आनंदाची बाब आहे, असे सांगत आमदार जोरगेवार म्हणाले की, या आराखड्यामुळे तीर्थक्षेत्राच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. मंदिर परिसराचा विकास, भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधांची निर्मिती आणि परिसराचे सौंदर्य वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने या निधीचा उपयोग होणार आहे. विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील.
ते पुढे म्हणाले की, वढा तीर्थक्षेत्राचा विकास केवळ धार्मिक सुविधांपुरता मर्यादित न राहता त्याला धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्व प्राप्त झाले पाहिजे. धार्मिक पर्यटन वाढल्यास परिसरातील स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि लहान-मोठ्या व्यवसायांना संधी उपलब्ध होईल. त्यातून स्थानिक रोजगारालाही चालना मिळू शकते. त्यामुळे मंजूर विकास आराखड्यातील कामे दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. विदर्भातील धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर वढा तीर्थक्षेत्राला महत्त्वाचे स्थान मिळावे, यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री नामदेव डाहुले यांच्या पुढाकारातून वढा येथे प्रसिद्ध कीर्तनकार सोपान कान्हेरकर यांच्या कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमालाही आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत कीर्तनाचा लाभ घेतला. यावेळी महामंत्री नामदेव डाहुले, महामंत्री रविंद्र गुरनुले, प्रकाश देवतळे, वढा सरपंच किशोर वराडकर, तालुकाध्यक्ष विनोद खेवले, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आशिष वाढई, नकोडा सरपंच किरण बांदुरकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. विठ्ठलभक्तीचा जयघोष, वारकरी परंपरेचा भक्तिमय गजर आणि भाविकांच्या श्रद्धेने वढा येथील कार्तिक पौर्णिमा यात्रा उत्साहात पार पडली.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






