चंद्रपूर शिवसेना राजीनामा जाहीर करताना पत्रकार परिषदेत बोलणारे ललित कासट.

चंद्रपुरात शिवसेनेत बंडाचा भडका! ललित कासट यांनी समर्थकांसह सोडला पक्ष, आमदार जोरगेवारांवर आरोप

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 27, 2026

चंद्रपूर – चंद्रपूर शिवसेना राजीनामा प्रकरणामुळे जिल्ह्यातील राजकीय चर्चांना वेग आला आहे. शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ते ललित कासट यांनी समर्थकांसह पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला. पत्रकार परिषदेत त्यांनी स्थानिक पदाधिकारी आणि पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याबाबत आरोप केले. पालकमंत्री हटाव कृती समितीचे स्वाक्षरी अभियान सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (चिचपल्ली मध्ये भीषण अपघात, जिवतीच्या युवकाचा मृत्यू, वाचा बातमी)

चंद्रपूरच्या राजकारणात मोठा स्फोट घडवत शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे कार्यकर्ते ललित कासट यांनी आज आपल्या समर्थकांसह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत स्थानिक नेतृत्वावर आणि पालकमंत्र्यांवर थेट तोफ डागली आहे. पालकमंत्री अशोक उईके यांच्याविरोधात ‘पालकमंत्री हटाव कृती समिती’ स्थापन करून शहरात स्वाक्षरी अभियान राबवल्यामुळे पक्षात तीव्र धुसफूस सुरू झाली होती, तसेच पदाधिकाऱ्यांकडून राजीनामा देण्याचा किंवा हकालपट्टी करण्याचा दबाव टाकला जात असल्याने आपण पक्ष सोडत असल्याचा आरोप ललित कासट यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केला.

चंद्रपूर शिवसेना राजीनामा; ललित कासट यांची भूमिका

महायुती सरकारने बाहेरच्या जिल्ह्यातील नेत्याला पालकमंत्री म्हणून लादल्यामुळे स्थानिक समस्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असून, गेल्या दोन वर्षांत एकही प्रभावी काम झाले नसल्याचा घणाघात कासट यांनी केला; तसेच निष्क्रिय पालकमंत्र्यांच्या जागी चंद्रपुरातील स्थानिक भूमिपुत्रालाच संधी द्यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी पुन्हा एकदा लावून धरली.

पत्रकार परिषदेत बोलताना ललित कासट यांनी आपल्याच पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. मे महिन्यात आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश केल्यानंतर आपण स्वतः कार्यकर्त्यांची फळी उभी केली, मात्र चंद्रपुरात पक्ष संघटना दुर्बल असून स्थानिक पदाधिकाऱ्यांना पक्ष वाढवण्यात कोणताही रस नसल्याचा दावा कासट यांनी केला; इतकेच नव्हे तर पक्षाच्या वर्धापन दिनी आपल्याशिवाय कोणी साधा कार्यक्रमही घेतला नाही, अशी टीका त्यांनी केली.

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सुरू केलेले आंदोलन स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या डोळ्यांत खुपले आणि त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी केल्याचे कासट यांनी सांगितले. यासोबतच, २६ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री अशोक उईके चंद्रपूर दौऱ्यावर असताना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन आपल्या हकालपट्टीसाठी फिल्डिंग लावली आणि यामध्ये आमदार किशोर जोरगेवार यांनीही प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप कासट यांनी केला आहे.

पक्षाचे पद सोडले असले तरी जनतेचा आवाज दडपला जाणार नाही, असा इशारा देत ‘पालकमंत्री हटाव कृती समिती’चा संयोजक म्हणून आपले स्वाक्षरी अभियान अधिक तीव्रतेने सुरूच राहील, असे ललित कासट यांनी ठणकावून सांगितले. गेल्या दोन दिवसांत हजारो नागरिकांनी या मोहिमेला उत्स्फूर्त पाठिंबा दिला असून, आता ही लढाई केवळ शहरापुरती मर्यादित न राहता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पोहोचवली जाईल, असा निर्धार कासट यांनी व्यक्त केला. कासट यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि थेट आरोपांमुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, महायुतीतील अंतर्गत विसंवाद चव्हाट्यावर आला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment