चंद्रपूर : चंद्रपूर महापौरपदावरून मनपा वर्तुळात राजकीय चर्चा सुरू झाली आहे. स्थायी समिती सभापती मनस्वी गिर्हे यांनी “येणाऱ्या काही महिन्यांत मी महापौर असणार,” असे जाहीर वक्तव्य केले. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. यामुळे मनपातील सत्ता समीकरणांकडे लक्ष लागले आहे.
राजकारणात महत्त्वाकांक्षा असणे स्वाभाविक मानले जाते, मात्र सत्तेची गणिते आणि अंतर्गत गटबाजी यामध्ये ही महत्त्वाकांक्षा कितपत पूर्णत्वास जाते, यावर आगामी समीकरणे अवलंबून असतात. चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या अशाच राजकीय महत्त्वाकांक्षेचे वारे वाहू लागले आहेत. १४ नोव्हेम्बर रोजी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात उबाठाच्या मनपा स्थायी समिती सभापती मनस्वी गिर्हे यांनी “येणाऱ्या काही महिन्यांत मी महापौर असणार,” असे जाहीर वक्तव्य केल्याने मनपा वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष बाब म्हणजे उबाठा नगरसेवक मनस्वी गिर्हे या मनपा स्थायी समिती सभापती पदी ईश्वर चिट्टीने जिंकल्या होत्या. (नियम सांगणाऱ्या खाकीची नियमांना केराची टोपली, वाचा बातमी)
चंद्रपूर महापौरपदाचा सव्वा-सव्वा वर्षाचा करार काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर मनपात भाजप आणि शिवसेना (उबाठा) यांची सत्ता एका स्टॅम्प पेपरवरील सव्वा-सव्वा वर्षांच्या करारातून स्थापन झाली होती. या करारानुसार, पहिले सव्वा वर्ष भाजपचा आणि पुढील सव्वा वर्ष उबाठा गटाचा महापौर राहण्याचे ठरले होते. सध्या भाजपच्या संगीता खांडेकर या महापौरपदी विराजमान आहेत. मात्र, राजकारणातील बदलती समीकरणे पाहता सव्वा वर्षानंतर भाजप महापौरपद सोडणार का, याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त केली जात आहे.
भाजप आणि उबाठा यांची सत्ता कशी स्थापन झाली, चंद्रपूर महापौरपद
भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने उबाठा व भाजपची ही सत्ता स्थापन झाली होती. दुसरीकडे, चंद्रपूरच्या राजकारणात आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील राजकीय मतभेद सर्वश्रुत आहेत. मनपातील भाजपच्या २३ नगरसेवकांपैकी मोठा गट आमदार जोरगेवार यांच्या समर्थकांचा असल्याचे बोलले जाते. या गटातटाच्या राजकारणात मनस्वी गिर्हे यांनी केलेले वक्तव्य हे आगामी काळातील मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत मानले जात आहेत. राजकीय सूत्रांच्या मते, सत्तेच्या पुढील टप्प्यात शिवसेना (उबाठा) गटाला सत्तेबाहेर ठेवण्याची रणनीतीही पडद्यामागे आखली जात असल्याची चर्चा आहे.
मनपा कारभाराबाबत नाराजी, चंद्रपूर महापौरपद
प्रशासकीय पातळीवर विचार करता, मनपाच्या कारभाराबाबत विविध स्तरांतून नाराजीचा सूर उमटत आहे. वेळेवर आमसभा न होणे, अद्याप प्रलंबित असलेली स्वीकृत सदस्यांची नेमणूक आणि प्रत्यक्ष कामांपेक्षा केवळ समाजमाध्यमांवरील ‘रील’च्या माध्यमातून दिसणारा विकास, यामुळे सत्ताधारी नगरसेवकांमध्येही अस्वस्थता असल्याची चर्चा आहे.
काँग्रेसची तयारी आणि पक्षीय बलाबल, चंद्रपूर महापौरपद
दरम्यान, राज्यात भाजपपासून फारकत घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने स्थानिक पातळीवर काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला विरोध म्हणून भाजपशी हातमिळवणी केली होती. या निर्णयामुळे पक्षावर राज्यभरातून टीका झाली होती. दुसरीकडे, काँग्रेसनेही आगामी महापौरपदाच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मागील निवडणुकीत केवळ एका मताने महापौरपद गमावलेल्या काँग्रेसने, सव्वा वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीत भाजप आणि उबाठा गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पूर्ण तयारी सुरू केल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे २७, जनविकास सेनेचे ३, भाजपचे २३, शिवसेना (उबाठा) ७, वंचित बहुजन आघाडी २, तर शिवसेना (शिंदे गट), बसपा, एमआयएम आणि अपक्ष प्रत्येकी १ असे पक्षीय बलाबल आहे. या आकड्यांच्या खेळात आणि नेत्यांच्या अंतर्गत संघर्षामध्ये सव्वा वर्षाचा करार पाळला जातो, की नवी राजकीय आघाडी उदयास येते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







