वरोरा : वरोरा खून प्रकरणात ७७ वर्षीय वडिलांच्या मृत्यूमागील कारणाचा उलगडा झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. वरोरा तालुक्यातील खेमजई येथे ३ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. सुरुवातीला बाथरूममध्ये पडल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शवविच्छेदन अहवाल आणि वैद्यकीय अभिप्रायानंतर पोलिसांनी मुलाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला.
दारूच्या नशेत झालेल्या वादातून पोटच्या मुलानेच ७७ वर्षीय वडिलांच्या डोक्यात दगडी पाटा घालून त्यांचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात उघडकीस आला आहे. सुरुवातीला बाथरूममध्ये घसरून पडल्याने मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यात आला होता; मात्र शवविच्छेदन अहवाल, वैद्यकीय अभिप्राय आणि सखोल चौकशीतून हा प्रकार हत्या असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शेगाव बुद्रुक पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. (वरोऱ्यात युवकाची हत्या, वाचा सविस्तर)
वरोरा खून प्रकरणात शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाचा खुलासा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास वरोरा तालुक्यातील मौजा खेमजई येथे घडली. मयत बाबा कवडू जिवतोडे (वय ७७, रा. खेमजई) हे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घरात स्वयंपाक करीत असताना त्यांचा मुलगा सूर्यभान बाबा जिवतोडे (वय ३५) हा बाहेरून दारू पिऊन घरी आला. स्वयंपाक आणि घरातील काम का केले नाही, यावरून वडिलांनी सूर्यभानला जाब विचारत शिवीगाळ केली व गालावर दोन थापडा मारल्या. याचा प्रचंड राग आल्याने सूर्यभानने वडिलांना ढकलून दिले, ज्यामुळे ते दरवाज्याजवळ कोसळले आणि त्यानंतर उठून बाजेवर झोपले. संतापाच्या भरात सूर्यभान स्वयंपाकघरात गेला आणि तेथील दगडी पाटा आणून वडिलांच्या डोक्यात जोरात मारला. या हल्ल्यात बाबा जिवतोडे बेशुद्ध पडले आणि त्यांच्या कानातून रक्तस्राव सुरू झाला.
घटनेनंतर जखमी वडिलांना उपचारासाठी नेण्यासाठी सूर्यभानने गावातील सुनील चौधरी यांची तवेरा गाडी घराजवळ आणली आणि दोघांनी मिळून जखमीस गाडीत टाकले. शेगाव बुद्रुककडे जात असताना खेमजईपासून काही अंतरावर मित्र अंकुश पारखी यांची तवेरा गाडी दिसल्याने सुनील चौधरी यांनी ती थांबवली आणि गावात काम असल्याचे सांगत जखमीस अंकुश पारखी यांच्या गाडीत हलवण्यात आले. त्यानंतर सूर्यभानने वडिलांना वरोरा येथील सरकारी रुग्णालयात नेले; तेथे प्राथमिक उपचार व डोक्याला पट्टी बांधल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र, त्याच दिवशी म्हणजेच ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजता डॉ. शशी प्रजापती यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
सुरुवातीला बाथरूममध्ये डोक्यावर पडल्याने मार लागून मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार चंद्रपूर येथील पोलीस मदत केंद्रावरून नोंद झालेल्या मर्गच्या आधारे घटनास्थळ शेगाव बुद्रुक पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने ५ नोव्हेंबर २०२६ रोजी शेगाव बुद्रुक पोलीस ठाण्यात कलम १९४ बीएनएसएस अन्वये मर्ग क्रमांक ३६/२०२६ नोंदवून तपास सुरू करण्यात आला. दरम्यान, ४ नोव्हेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल काळे यांनी शवविच्छेदन केले. २० नोव्हेंबर रोजी प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण ‘डोक्याला झालेली प्राणघातक मारहाण’ (Death due to Homicidal Head Injury) असे नमूद करण्यात आले. तसेच २५ नोव्हेंबर रोजी विचारलेल्या वैद्यकीय क्वेरीवर या जखमा बाथरूममध्ये पडल्याने होणे शक्य नसल्याचा लेखी अभिप्राय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला.
तपासादरम्यान मयताची पत्नी शोभा बाबराव जिवतोडे (वय ६५) आणि मुलगी प्रियंका विनोद धारणे (वय २८) यांचे जबाब नोंदविण्यात आले. मयत वडिलांना आणि मुलगा सूर्यभानला दारूचे व्यसन असून दोघांमध्ये नेहमी वाद व मारामारी होत असल्याचे त्यांनी सांगितले; याच त्रासामुळे सून शारदा या माहेरी व चंद्रपूर येथे राहण्यास गेल्या होत्या आणि पत्नीही त्यांच्याकडे राहायला गेल्या होत्या, तर मुलगीही वादामुळे गावी येत नव्हती. पत्नीने दिलेल्या पुरवणी जबाबात पतीचा मृत्यू बाथरूममध्ये पडून नव्हे, तर घरी दोघेच असताना मुलानेच जड वस्तूने डोक्यात मारल्याने झाल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलेल्या सूर्यभान याने विचारपूस दरम्यान संपूर्ण प्रकाराची कबुली दिली.
या सर्व निष्कर्षांवरून पोलीस उपनिरीक्षक सुमित ईश्वर कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेगाव बुद्रुक पोलीस ठाण्यात २६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री गुन्हा नोंद क्रमांक ०३४३ अन्वये आरोपी सूर्यभान बाबा जिवतोडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






