भद्रावती वडील हत्या प्रकरणाशी संबंधित चंदनखेडा येथील घराबाहेरील दृश्य

भद्रावतीत वडिलांच्या हत्येचे गूढ उकलले; लोखंडी सब्बलने वार केल्याचा आरोप

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 28, 2026

भद्रावती : भद्रावती वडील हत्या प्रकरणात चंदनखेडा येथील मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. २५ नोव्हेंबर रोजी वडिलांच्या डोक्यावर लोखंडी सब्बलने वार केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला जमिनीवर पडल्याने मृत्यू झाल्याचा बनाव केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासानंतर हा प्रकार उघड झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. (मुलाने केली वडिलाची हत्या, वाचा बातमी)

विनाकारण बडबड आणि शिवीगाळ करण्याच्या कारणावरून संतापाच्या भरात मुलानेच आपल्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी सब्बलने जीवघेणा वार करून खून केल्याची धक्कादायक घटना भद्रावती तालुक्यातील मौजा चंदनखेडा येथे उघडकीस आली आहे. सुरुवातीला जमिनीवर पडल्याने मृत्यू झाल्याचा बनाव रचणाऱ्या आरोपी मुलाचा खोटारडेपणा शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक तपासणी आणि सखोल चौकशीतून उघड झाला असून, याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध खुनाचा व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

भद्रावती वडील हत्या प्रकरणाचा तपास कसा उघड झाला?

सुधाकर बालाजी चौखे असे मृत वडिलांचे नाव असून, त्यांचा मुलगा अमित सुधाकर चौखे (रा. चंदनखेडा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास अमित घरात टीव्ही बघत आराम करीत असताना त्याचे वडील सुधाकर चौखे हे विनाकारण बडबड करून शिवीगाळ करीत होते. अमितने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र बडबड सुरूच राहिल्याने रागाच्या भरात त्याने घरातील लोखंडी सब्बलने वडिलांच्या डोक्यावर जोरदार प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले.

हल्ल्यानंतर आरोपी अमितने रक्ताने माखलेली ती लोखंडी सब्बल घराबाहेर नेऊन पाण्याने धुतली आणि पुन्हा त्याच ठिकाणी ठेवून तो घरातून निघून गेला. त्यानंतर सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास तो पुन्हा घरी परतला आणि स्वतःला वाचवण्यासाठी तसेच गुन्हा लपवण्यासाठी वडील जमिनीवर पडून डोक्याला मार लागल्याने जखमी झाल्याचा बनाव लोकांसमोर रचला. सुरुवातीला या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यातून प्राप्त मर्ग डायरीच्या आधारे भद्रावती पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक ८९/२६ कलम १९४ बीएनएसएस अन्वये नोंद करून चौकशी सुरू करण्यात आली होती.

मात्र, प्रोव्हिजनरी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण डोक्याला झालेली गंभीर दुखापत (Homicidal) असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी पंच व फॉरेन्सिक टीमच्या उपस्थितीत घटनास्थळाची पाहणी केली असता, घराशेजारील टिनच्या खोलीत सिमेंट फ्लोर संपून मातीचा फ्लोर सुरू होणाऱ्या जागी रक्ताचे डाग आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळाचा तपशील आणि तांत्रिक व वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे आरोपी अमित चौखे याची अधिक चौकशी केली असता, त्याने रागाच्या भरात लोखंडी सब्बलने वडिलांच्या डोक्यावर वार करून त्यांचा जीव घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली.

या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय रामहित मिश्रा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.४७ वाजता आरोपी अमित सुधाकर चौखे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०३(१) (खून) आणि कलम २३८ (पुराव्याची विल्हेवाट लावणे/लपवणे) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक १११८/२०२६ नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन रामचंद्र धोंगडे करीत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment