Balu Dhanorkar Quiz : वरोरा येथे खासदार प्रतिभा धानोरकर सामान्य ज्ञान परीक्षेच्या उद्घाटनावेळी

वरोरा येथे बाळूभाऊ धानोरकर जयंतीनिमित्त सामान्य ज्ञान परीक्षा; खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते शुभारंभ

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 29, 2026

चंद्रपूर : (Balu Dhanorkar Quiz) वरोरा येथे दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सामान्य ज्ञान परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते परीक्षेचा शुभारंभ झाला. ६ ते १६ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा मोफत आयोजित करण्यात आली होती. भाऊंचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. (वाघाच्या हल्ल्याने चंद्रपूर हादरला)

जनसामान्यांचे नेते आणि दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘भाऊंचा वारसा’ यांच्या वतीने वरोरा येथील लोकमान्य महाविद्यालय येथे ‘सामान्य ज्ञान परीक्षा’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले आणि या परीक्षेचा प्रारंभ केला.

Balu Dhanorkar Quiz : वरोऱ्यात परीक्षेचा उत्साह

६ ते १६ वर्ष वयोगटातील लहान मुला-मुलींमध्ये आदरणीय भाऊंचे विचार, त्यांची जनसेवेची धडपड, संघर्षमय व प्रेरणादायी जीवन आणि त्यांनी केलेले कार्य पोहोचावे, या उदात्त उद्देशाने या विशेष परीक्षेचे आयोजन पूर्णपणे मोफत करण्यात आले होते. या परीक्षेला वरोरा परिसरातील लहान मुला-मुलींचा व विद्यार्थ्यांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ६० मिनिटांच्या या ऑफलाइन परीक्षेत एकूण ६० बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले होते, ज्यामध्ये स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या जीवनावर आधारित ३० प्रश्न आणि जनरल नॉलेजवर आधारित ३० प्रश्नांचा समावेश होता. 

“भाऊंनी जनसेवेचा जो वारसा आपल्याला दिला आहे, तो असाच नव्या पिढीपर्यंत पोहोचवत राहणे आणि त्यांच्या विचारांची पेरणी बालमनावर करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,” अशा भावना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केल्या. तसेच परीक्षेला बसलेल्या सर्व लाडक्या चिमुकल्यांचे कौतुक करत त्यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी आयोजकांकडून भव्य रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली असून यामध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्याला २१,००० रुपये, द्वितीय क्रमांकाला ११,००० रुपये आणि तृतीय क्रमांकाला ५,००० रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे, तसेच सहभागी प्रत्येक परीक्षार्थीला कौतुक म्हणून प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे. या स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण सोहळा शनिवार, दिनांक ४ जुलै २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता ‘धानोरकर जनसंपर्क कार्यालय, वरोरा’ येथे आयोजित करण्यात आला आहे.

या उद्घाटन कार्यक्रमाला वरोरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अर्चना ठाकरे, उपनगराध्यक्षा योगिता नेरकर, तसेच गजानन मेश्राम, विलास टिपले, बंडू देऊळकर, शुभम चिमुरकर, राहुल देवडे, मनीष जेठानी, प्रदीप बुरान, अनिल झटिंग, अभय ठावरी, मंगला पिंपळशेंडे यांच्यासह सर्व सन्माननीय नगरसेवक, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment