ब्रम्हपुरी: Brahmapuri Gambling Raid अंतर्गत ब्रम्हपुरी पोलिसांनी मौजा कुर्झा परिसरातील स्मशानघाटाजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अचानक धाड टाकली. या कारवाईत ७ जणांना रंगेहात पकडण्यात आले असून मोठी रोकड व जुगार साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८ जून २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचे पथक परिसरात गस्त घालत होते. दरम्यान, मौजा कुर्झा येथील स्मशानघाटा शेजारील नाल्याकाठच्या सार्वजनिक जागेत काही इसम पैशांची बाजी लावून ‘कटपत्ता’ नावाचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष सदर ठिकाणी लपत-छपत जाऊन छापा टाकला. (कंत्राटदाराच्या वाहनातून लाखोंची रक्कम लंपास)
ब्रम्हपुरी जुगार अड्ड्यावर पोलिसांची अचानक धाड Brahmapuri Gambling Raid
या छाप्यामधून पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या ७ आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सोनू निलकंठ उरकुडे (वय ३०, रा. भवानी वॉर्ड, ब्रम्हपुरी), इंद्रजीत केवळ शेंडे (वय १८, रा. अहेरनवरगाव), अरुण जनार्धन जराते (वय ३८, रा. अहेरनवरगाव), सुरज माणिक बेंदरे (वय २२, रा. उदापूर), शोहेब शम्मी पठाण (वय ३०, रा. हनुमान नगर, ब्रम्हपुरी), अजय भाऊराव रामटेके (वय ३०, रा. वायगाव, ता. ब्रम्हपुरी) आणि अनिल तुकाराम दुमाने (वय २६, रा. बाजारपेठ, आरमोरी, जि. गडचिरोली) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून १४,८४० रुपये नगदी आणि जुगाराच्या डावावर लावलेले १,२०० रुपये, असे एकूण १६,०४० रुपये हस्तगत केले. तसेच घटनास्थळावरून २०० रुपये किमतीचे पत्त्यांचे ३ कॅट जप्त करण्यात आले.
या प्रकरणी पोलीस हवालदार अरुण एकनाथ पिसे यांच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ च्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षेचा असल्याने, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आरोपींना अटक न करता कलम ३५(३) बी.एन.एस.एस. अन्वये नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. ठाणे प्रभारी अधिकारी प्रमोद गोविंदराव बनबले यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार राजेंद्रनाथ जतींद्र मंडल पुढील तपास करीत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






