चंद्रपूर : Chandrapur BLO App मधील डेटा मॅपिंग समस्येमुळे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील निवडणूक आयोगाच्या एसआयआर मोहिमेच्या कामावर परिणाम होत असल्याची बाब समोर आली आहे. काही मतदान केंद्रांवरील बीएलओ मोबाईल अॅपमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम रखडले आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील काही मतदान केंद्रांवर बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) यांच्या मोबाईल अॅपमध्ये डेटा मॅपिंग होत नसल्याने एसआयआर मोहिमेच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, तुषार सोम, बलराम डोडाणी, सुमित बेले, विश्वजित शाहा आदी उपस्थित होते. सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, विधानसभा क्षेत्रातील काही मतदान केंद्रांवर बीएलओ मोबाईल अॅपमध्ये डेटा मॅपिंगची समस्या अनेक दिवसांपासून कायम आहे. त्यामुळे संबंधित मतदान केंद्रांवरील मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण आणि पडताळणीचे काम रखडले आहे. (चंद्रपुरात १८ जून रोजी जीएसटी भवन चे उदघाटन)
Chandrapur BLO App मध्ये नेमकी समस्या काय?
विशेषतः बूथ क्रमांक ७ व ८ (मोरेवा), बूथ क्रमांक २२९ व २३० (लालपेठ), बूथ क्रमांक ३१६ व ३२० (हनुमान नगर) तसेच बूथ क्रमांक ३७७ (नकोडा) येथे ही समस्या प्रकर्षाने जाणवत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असला तरी अद्याप तांत्रिक अडचणी दूर झालेल्या नाहीत. सध्या निवडणूक आयोगाच्या वतीने एसआयआर मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी डेटा मॅपिंगचे काम तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे संबंधित विभागाला आवश्यक निर्देश देऊन बीएलओ अॅपमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात, जेणेकरून मतदार यादी अद्ययावतीकरणाचे काम सुरळीतपणे पूर्ण होईल, अशी मागणी केली आहे.
यावेळी पक्षाच्या वतीने निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कामांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये आणि मतदारांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now
