चंद्रपूर : चंद्रपूर डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आणत आहे. अनेक प्रभागांमध्ये रुग्ण वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अस्वच्छता, उघड्या नाल्या आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अभावावरून मनपा प्रशासनावर टीका होत आहे. बालरोग तज्ज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी तातडीने स्वच्छता आणि डेंग्यू प्रतिबंधक मोहीम राबवण्याची मागणी केली आहे. (चंद्रपूर शहरात ८४२ कोटींच्या विकासकामांचा बोजवारा, वाचा बातमी)
चंद्रपूर डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील अनेक प्रभागांमध्ये सध्या डेंग्यूने अक्षरशः थैमान घातले असून, दररोज लहान मुलांसह महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल होत आहेत. मात्र, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असतानाही मनपा प्रशासनाकडून आणि सत्ताधाऱ्यांकडून कोणतीही ठोस उपाययोजना राबवली जात नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निवडणुका होऊन महापौर आणि नगरसेवकांच्या हाती शहराची सूत्रे आली; परंतु प्रभागातील जीवघेण्या समस्या बाजूला सारून मूलभूत समस्येंवर डोळेझाक होत आहे.
शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून उघड्या नाल्यांच्या माध्यमातून डेंग्यू आणि मलेरियाला जणू खुले निमंत्रणच दिले जात आहे. एकीकडे डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी फवारणी किंवा स्वच्छतेची मोहीम संथ गतीने सुरु असताना, दुसरीकडे मनपातील लोकप्रतिनिधी आपसातील राजकारणात आणि कुरघोड्यांमध्ये अडकून पडले आहेत. नुकत्याच झालेल्या आमसभेत स्वतःचा पगार वाढवण्यासाठीचा प्रस्ताव पुढे रेटत सर्वपक्षीय एकमताने पारित करून घेण्यात आला, मात्र जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना त्यावर गांभीर्याने चर्चा झालेली नाही. वेळेवर आमसभा होत नसल्याचा आणि स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती अद्याप रखडल्याचा मुद्दाही प्रशासकीय अनास्थेवर बोट ठेवणारा ठरत आहे.
चंद्रपुरात डेंग्यूचा संसर्ग वेगाने वाढत असताना नगरसेवक नेमका कोणता विकास करण्यात गुंतले आहेत, असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत. सध्या डेंग्यूचे डास रोग पसरवण्यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागले आहेत, परंतु लोकप्रतिनिधींचे या गंभीर बाबीकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा घणाघात बालरोग तज्ज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी केला आहे. रुग्णालयांतील वाढती गर्दी आणि बालकांचे बिघडणारे आरोग्य पाहता मनपाने तातडीने जागे होऊन स्वच्छता व प्रतिबंधात्मक मोहीम युद्धपातळीवर राबवावी, अन्यथा नागरिकांचा उद्रेक अटळ असल्याचा इशारा दिला जात आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






