Chandrapur Eye Bank उभारणीची घोषणा करणारे आमदार किशोर जोरगेवार

चंद्रपूरमध्ये नेत्रदान चळवळीला गती; अत्याधुनिक नेत्रपेढी उभारणार, आमदार किशोर जोरगेवारांची घोषणा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 10, 2026

चंद्रपूर : Chandrapur Eye Bank नेत्रदान, अवयवदान आणि देहदान हे केवळ दान नसून मानवतेची सर्वोच्च सेवा आहे. आपल्या मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचे सामर्थ्य या दानांमध्ये आहे. समाजात अशा दात्यांमुळेच अनेकांना नवे जीवन आणि नवी आशा मिळते. त्यामुळे या चळवळीला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी चंद्रपुरात अत्याधुनिक नेत्रपेढी (आय बँक) उभारणार असल्याचे  प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. (चंद्रपुरात एसीबीची कारवाई)

जागतिक दृष्टीदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने महानगर कार्यालयात नेत्रदान, अवयवदान आणि देहदान करणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नेत्रदान, अवयवदान आणि देहदानासाठी पुढाकार घेणाऱ्या व्यक्तींचा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक, डॉ. तारासिंग आडे, नेत्र चिकित्सा अधिकारी विवेक मसराम, नेत्र समुदेशक योगेंद्र इंदुरकर, समाजसेवा अधिकारी भास्कर झलके, चंद्रपूर महानगर पालिका गट नेते शेखर शेट्टी, चंद्रपूर विधानसभा प्रमूख वंदना हातगावकर, नगरसेवक आशिष मासिरकर, नगरसेविका सविता कांबळे, अनु. जाती अध्यक्ष विमल कातकर, डॉ सपन दास आदींची मंचावर उपस्थिती होती.

Chandrapur Eye Bank उभारणीची मोठी घोषणा

यावेळी आ. जोरगेवार पुढे म्हणाले की, नेत्रदानामुळे एखाद्या अंध व्यक्तीच्या आयुष्यात प्रकाश निर्माण होतो, तर अवयवदानामुळे अनेकांना नवजीवन मिळते. देहदानामुळे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्राला मोठी मदत होते. त्यामुळे समाजात या विषयाबाबत जागृती होणे अत्यंत आवश्यक आहे.

ते पुढे म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्यात नेत्रदानाबाबत जनजागृती वाढत असली तरी स्वतंत्र आणि सुसज्ज नेत्रपेढी ची आवश्यकता आहे. नेत्रपेढी उभारल्यास नेत्रदानाची प्रक्रिया अधिक सुलभ होईल आणि अनेक गरजू रुग्णांना दृष्टिदान याचा लाभ मिळू शकेल. यासाठी संबंधित संस्था, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रशासन यांच्या सहकार्याने पुढाकार घेण्यात येईल.

            आ. जोरगेवार यांनी नेत्रदान, अवयवदान आणि देहदान करणाऱ्या व्यक्तींचे विशेष कौतुक करत त्यांना समाजासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले. अशा व्यक्तींच्या कार्यामुळे समाजात सेवाभाव आणि मानवतेची भावना अधिक दृढ होत असल्याचे ते यावेळी म्हणाले. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment