Chandrapur Karjmafi Yojana

चंद्रपुरात ७२ हजार शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी; बँकांना व्याज न लावण्याचे निर्देश!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 16, 2026

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील ७२ हजार ३८८ शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाच्या (Chandrapur Karjmafi Yojana) अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना आता २ लाख रुपयांपर्यंत थेट कर्जमाफी दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानसभेत या ऐतिहासिक निर्णयाची अधिकृत घोषणा केली. या महत्त्वपूर्ण शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चंद्रपूर जिल्ह्यात तातडीने आणि पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली आहे. (ताडाळी मध्ये मोठ्या प्रमाणात डिझलची अवैध विक्री, पोलीस अधीक्षकांना निवेदन)

Chandrapur Karjmafi Yojana : चंद्रपूर जिल्ह्यातील ७२ हजार खातेदारांची माहिती पोर्टलवर

चंद्रपूर जिल्ह्यातील 72 हजार 388 खातेदारांची माहिती पोर्टल वर अपलोड करण्यात आली असून यात 43 हजार 816 खातेदार  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तर 28 हजार 572 खातेदार हे राष्ट्रीयकृत बँकेचे आहेत. यापूर्वी महात्मा ज्योतिराव फूले कर्जमाफी योजनेत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी असलेली 50 हजार रुपयांची अट आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यतची कर्जमाफी मिळणार आहे. तसेच 2026-27 मधील नियमित परतफेडीची अट सुद्धा रद्द करण्यात आली आहे.

पुढे पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, 2 लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी 2 लाखावरील रक्कम भरली तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 2 लाखांपर्यंतची रक्कम शासनाकडून माफ केली जाणार आहे. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होईपर्यंत त्यांच्या थकीत पीक कर्जावर कोणतेही व्याज आकारू नये, असे स्पष्ट निर्देश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांना दिले आहेत.

शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्जमाफीच्या अंमलबजावणीत आधार प्रमाणीकरण, बँक खात्यांची पडताळणी आणि तांत्रिक प्रक्रियेमुळे काहीसा विलंब होत असला, तरी या कालावधीत शेतकऱ्यांवर अतिरिक्त व्याजाचा बोजा पडू नये, यासाठी शासनाने शून्य टक्के व्याजाची तरतूद केली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून नव्या हंगामासाठी त्यांना सक्षमपणे उभे राहण्यास मदत होणार आहे.

राज्य शासनाच्या या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणातून मुक्त करून त्यांना पुन्हा नियमित कर्जपुरवठा उपलब्ध करून देणे हा आहे. पात्र शेतकऱ्यांच्या थकीत पीककर्जाची रक्कम थेट त्यांच्या कर्जखात्यात ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात येणार असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे.

दरम्यान, शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत, असेही पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment