चंद्रपूर : Karjmukti Portal Updates बद्दल राज्याच्या सहकार विभागाने महत्त्वाची माहिती प्रसिद्ध केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत गाव पातळीवरील यादी आणि पोर्टलवरील थकबाकीत फरक असल्यास पोर्टलवरील रक्कमच ग्राह्य धरली जाईल. सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी सर्व बँकांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. चंद्रपूर जिल्हा उपनिबंधक जयसिंग ठाकूर यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. (हे हि वाचा – कर्जमुक्ती योजना महाराष्ट्र – ईकेवायसी आता मोफत)
३१.१७ लाख कर्जखात्यांची माहिती बँकांनी पोर्टलवर केली सादर
कर्जमाफी व एकवेळ समझोता घटकाकरिता योजनेच्या पोर्टलवर राज्यातील बँकांनी एकूण 31.17 लाख कर्जखात्यांची माहिती सादर केली आहे. बँकेमार्फत सादर केलेल्या कर्जखात्यांचे महा-आयटीमार्फत संगणकीय संस्करण करून 25 जुलै 2026 रोजी एकूण 16.96 लाख कर्जखात्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिध्द करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील 7.03 लाख कर्जखाती व व्यापारी बँकांकडील 9.93 लाख कर्जखात्यांचा समावेश आहे. सदर योजनेतील गाव पातळीवर प्रसिध्द झालेल्या याद्यामध्ये, व्यापारी बँकांमधील एनपीए खातेदार शेतक-यांच्या नावासमोर दर्शविलेल्या थकबाकी रक्कम तसेच योजनेच्या पोर्टलवरील रकमेत फरक असल्याचे निदर्शनास आले आहे.
३१ मार्च २०२६ पर्यंतची थकबाकीची रक्कमच पोर्टलवर उपलब्ध
त्यामुळे गाव पातळीवर प्रसिद्ध केलेली यादी व योजनेच्या पोर्टलवरील शेतकऱ्यांच्या थकबाकी रक्कमेत फरक असल्यास योजना पोर्टलवरील थकबाकीची रक्कम ग्राह्य धरावी. पोर्टलवर दिसणारी शेतकऱ्यांच्या कर्जाची थकबाकीची रक्कम 31 मार्च 2026 रोजीची आहे. शासनाने सर्व बँकांना 1 एप्रिल 2026 नंतरच्या व्याजाची रक्कम न आकारणाच्या सुचना दिलेल्या आहेत व सर्व बँकांनी त्या मान्य असल्याचे लेखी कळविले आहे. शेतकऱ्यास योजनेच्या पोर्टलवर दिसणारी रक्कम मान्य असल्यास त्यांनी आधार प्रमाणीकरण करावे.
आधार प्रमाणीकरण केल्यानंतर प्रमाणीकरण यशस्वी झाल्याची पावती शेतक-यांना प्राप्त होणार आहे. या पावतीमध्ये शेतकऱ्याची कर्जमुक्ती होणाऱ्या रक्कमेची माहिती उपलब्ध आहे. आधार प्रमाणीकरण केल्यानंतर 31 मार्च 2026 वरील कर्जबाकीच्या लाभाची रक्कम त्यांच्या कर्जखात्यात डीबीटी द्वारे जमा केली जाणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यास कर्ज बेबाकी प्रमाणपत्र देण्यात येईल. कर्जमुक्ती झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँकेच्या शाखेत व विविध कार्यकारी सेवा संस्थांमध्ये लावण्यात येतील. कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना संबंधित बँकेमार्फत खरीप पीक कर्जाची उपलब्धता होणार आहे.
योजनेच्या पोर्टलवरील रक्कम किंवा पोर्टलवरील शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत इतर कोणताही तपशील शेतकऱ्यास अमान्य असल्यास त्याने पोर्टलवर तक्रारीची नोंद करावी. सदर तक्रारीचे निराकरण जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती मार्फत केले जाईल, असे राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक दिपक तावरे यांच्या पत्रात नमुद असल्याचे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) जयसिंग ठाकूर यांनी कळविले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






