Chandrapur Tiranga Bike Rally led by MLA Kishor Jorgewar

चंद्रपुरात आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा बाईक रॅली

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 15, 2026

चंद्रपूर : Chandrapur Tiranga Bike Rally चे आयोजन चंद्रपूर शहरात भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आले. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित या रॅलीत आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वतः बाईक चालवली. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी १० वाजता ही रॅली सुरू झाली. शेकडो देशभक्त नागरिक हातात तिरंगा घेऊन या रॅलीत सहभागी झाले होते. (हे हि वाचा – चंद्रपूर मनपात महापौरांनी केले ध्वजारोहण)

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी १० वाजता रॅलीला सुरुवात झाली. आमदार जोरगेवार यांनी स्वतः बाईक चालवत रॅलीचे नेतृत्व केले. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने दुचाकींवर तिरंगा ध्वज घेऊन रॅलीत सहभागी झाले होते. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा देशभक्तीपर घोषणांनी शहरातील प्रमुख मार्ग दुमदुमून गेले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आ. किशोर जोरगेवार म्हणाले की, तिरंगा हा केवळ आपल्या देशाचा ध्वज नाही, तर तो देशाच्या स्वाभिमानाचे, त्यागाचे आणि एकतेचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असून, राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणे हीच त्यांच्याप्रती खरी आदरांजली आहे. प्रत्येक नागरिकाने देशाच्या प्रगतीसाठी आपले योगदान देत राष्ट्र प्रथम या भावनेने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, आजच्या तिरंगा बाईक रॅलीच्या माध्यमातून चंद्रपूर शहरात देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. युवकांनी देशाच्या विकासात सक्रिय सहभाग घ्यावा आणि राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव व सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. तिरंगा प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान आणि देशसेवेची प्रेरणा निर्माण करणारा आहे, असेही त्यांनी सांगितले.

रॅलीदरम्यान सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायन करण्यात आले. राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, जटपुरा गेट, प्रियदर्शिनी चौक, वरोरा नाका, जनता कॉलेज, वाहतूक कार्यालय, एसटी वर्कशॉप चौक, रामनगर पोलीस स्टेशन चौक, बंगाली कॅम्प चौक मार्गे रॅली गिरणार चौक येथे पोहोचली. भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने आयोजित या तिरंगा बाईक रॅलीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा चंद्रपूरकरांच्या राष्ट्रभक्तीची प्रचिती देणारा ठरला.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment