चंद्रपूर – तृतीयपंथी समुदाय चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी कल्याण मंडळाच्या सह-उपाध्यक्षा डॉ. सानवी जेठवानी यांचे स्वागत करण्यात आले. भाजपच्या चंद्रपूर महानगर कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, की तृतीयपंथींना शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या समान संधी मिळाव्यात. तसेच, कार्यक्रमात चंद्रपूरमधील तृतीयपंथी समुदायातील अनेक सदस्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. जोरगेवार यांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. (नशामुक्त चंद्रपूरसाठी पोलिसांची मोहीम, वाचा बातमी)
तृतीयपंथी समुदाय चंद्रपूर: डॉ. सानवी जेठवानी यांचे स्वागत
तृतीयपंथी समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने स्थान मिळवून देण्यासाठी त्यांना समान संधी, शिक्षण, आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. तृतीयपंथी बांधवांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून, त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी कल्याण मंडळाच्या सह-उपाध्यक्षा डॉ. सानवी जेठवानी यांचे श्री माता महाकालीच्या पावन नगरी चंद्रपूर येथे आगमन झाले. यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या चंद्रपूर महानगर कार्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आयोजित स्वागत कार्यक्रात आमदार किशोर जोरगेवार यांनी तृतीयपंथी समुदायाच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.
यावेळी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, जेष्ठ नेते प्रकाश देवतळे, महामंत्री नामदेव डाहुले, गटनेता शेखर शेट्टी, नगरसेविका सविता कांबळे, राज कचारे, साजन बहोरिया, एस.आय.आर. प्रमुख सुमित बेले, राकेश बोमनवार, हेमलता खोब्रागडे, रीना साखरकर, मनीषा पडगेलवार आदिंची उपस्थिती होती.
आमदार जोरगेवार यांची भूमिका: समान संधी आणि सन्मान
तृतीयपंथी समुदायातील नागरिकांनाही समाजातील इतर घटकांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा आणि प्रगती करण्याचा समान अधिकार आहे. त्यांना शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी समाजाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. सामाजिक भेदभाव दूर करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे आमदार जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी डॉ. सानवी जेठवानी यांनी तृतीयपंथी समुदायाच्या हक्कांचे संरक्षण, शिक्षण, आरोग्य सुविधा आणि सामाजिक पुनर्वसन या विषयांवर आपले विचार मांडले. तृतीयपंथी व्यक्तींना सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा आणि समाजात समानतेची भावना रुजावी, यासाठी कल्याण मंडळाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तृतीयपंथी समुदायाच्या समस्या सोडविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे चंद्रपूर येथील तृतीयपंथी समुदायातील अनेक सदस्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. आमदार किशोर जोरगेवार यांनी नव्याने पक्षात सहभागी झालेल्या सदस्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन विकासाची वाटचाल करणे, हीच पक्षाची भूमिका असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






