Gadchiroli Farmers Congress पत्रकार परिषदेत महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे वक्तव्य

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू आर्थिक मदत ५० लाख व शासकीय नोकरी द्या – कांग्रेस नेते महेंद्र ब्राह्मणवाडे

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 17, 2026

चंद्रपूर: Gadchiroli Farmers Congress मुद्द्यावर चंद्रपुरात पत्रकार परिषद पार पडली. काँग्रेस नेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी गडचिरोली, चिमूर व ब्रम्हपुरी भागातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. सिंचन, बाजारपेठ, नुकसानभरपाई आणि समृद्धी महामार्गाबाबत त्यांनी ठोस मागण्या केल्या. जंगली प्राण्यांच्या हल्ल्यातील मदतीत वाढ करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (हे हि वाचा – चंद्रपुरात भाजपचा आशीर्वादाचा दिवा)

Gadchiroli Farmers Congress: पत्रकार परिषदेत कोणते मुद्दे मांडले?

गडचिरोली जिल्ह्यासह चिमूर आणि ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूर येथे काँग्रेस नेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी गडचिरोली व लगतच्या ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून असतानाही त्यांना सिंचन, शेतीमालाची वाहतूक, योग्य बाजारपेठ आणि शासकीय योजनांचा लाभ मिळताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. शेतीमालाला योग्य भाव, धान खरेदी, आरोग्य सुविधा, नुकसानभरपाई, शेतजमिनींचे प्रश्न आणि ग्रामीण भागातील रस्ते यांसारख्या अनेक मूलभूत मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित राहिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याची चिंता ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केली.

जंगली प्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसानभरपाई वाढवण्याची मागणी

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी विविध गंभीर मुद्द्यांवर शासनाचे लक्ष वेधले. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना सध्या देण्यात येणारी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत वाढवून ती ५० लाख रुपये करण्यात यावी, तसेच संबंधित कुटुंबातील एका पात्र सदस्यास तातडीने शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली. याशिवाय गडचिरोली, ब्रम्हपुरी आणि भंडारा परिसरातून प्रस्तावित समृद्धी महामार्गाचा मार्ग निश्चित करताना स्थानिक शेतकऱ्यांशी थेट चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात यावा, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमिनी संपादित करू नयेत, असा इशाराही त्यांनी दिला.

स्थानिक पातळीवर एमआयडीसीची जागा उपलब्ध असतानाही गेल्या १५ वर्षांत एकही मोठा उद्योग उभा राहिला नसल्यामुळे तरुणांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत असल्याचे सांगत, येथे नवे उद्योग आणून बेरोजगारांना रोजगार देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अवैध बनावट तंबाखू, गुटखा व इतर प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीवर कठोर निर्बंध घालून कडक कारवाई करावी, जेणेकरून कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना आळा घालता येईल, असा आग्रह त्यांनी धरला. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि प्रलंबित मागण्या पूर्ण होईपर्यंत काँग्रेस पक्ष सातत्याने रस्त्यावर उतरून पाठपुरावा करेल, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला युवक काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, नागभीड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद चौधरी, चिमूर युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष प्रशांत डवले, माजी जिल्हा महासचिव रोहन नन्नावरे, कार्याध्यक्ष सजित कारेकार, विधानसभा महासचिव कुंदन पडवेकर, गडचिरोली तालुका काँग्रेस अध्यक्ष वसंत राऊत, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष दिवाकर निसार, सावली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रमोद दाजगाये, विपुल येलटीवार, अमर नवघडे, युवराज घोटेकर, चेतन खोब्रागडे, राजेंद्रनाथ मेश्राम, हरीश मुंडे, हितेश ठाकरे, पवन नवघडे, समीर कुळमेथे, शुभम कुळमेथे, दीपक ठाकरे, सचिन वाटगुरे, भगवान डाकारे, कृष्णा कोहपरे, रामाजी हुलके, राजेश भोंडे यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment