BJP Shiv Sena UBT Alliance : चंद्रपूर - चंद्रपूर महापौर पदावरून शहरातील राजकारण सध्या चांगलंच तापलेलं दिसून येत आहे, कांग्रेसच्या भांडणांनंतर अखेर त्याचा सुखद शेवट झाला, मात्र बहुमत नसताना महापौर कसा बसणार याचा पेच मात्र कायम आहे, या पेचात शिवसेना ठाकरे पक्ष आमचा महापौर व्हावा असा हट्ट घेऊन बसलाय, अश्यात शिवसेना ठाकरे व भाजपची गुप्त बैठक नागपुरात झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (प्रभागातही जनता वाऱ्यावर, सत्तेसाठी नगरसेवकांची हॉटेलवारी)
या बैठकीत भाजप नेते सह शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे उपस्थित होते, सदर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे, येत्या २ दिवसात दोन्ही पक्ष एकत्र येत अधिकृत रित्या पत्रकार परिषद द्वारे सत्ता वाटपाचा नेमका फॉर्म्युला काय हे सांगणार आहे. मागील १५ दिवसात कांग्रेस पक्षात अंतर्गत कुरघोडी सुरु होत्या, कांग्रेस पक्षातील नेते आपसात नगरसेवकांची पळवापळवी करू लागले होते.
या धावपळीत महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी मित्रपक्षाशी निवांत बैठक सुद्धा या नेत्यांनी केली नाही, आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जणू पक्षात नेते युद्ध करीत होते. भाजपची राज्यात व केंद्रात सत्ता स्थापन असून चंद्रपूर शहराचा विकास करायचा असेल तर शिवसेना व भाजप या निमित्ताने एकत्र येऊ शकतात. शिवसेना ठाकरे पक्षाने अगोदरची अडीच वर्षे आपला महापौर मागितला असून पुढची अडीच वर्षे मित्रपक्षाचा महापौर होणार. येत्या दोन दिवसात चंद्रपूरच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे.
Leave a Comment