चंद्रपूर - राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पुढाकारातून दिनांक २४ मे २०२६ रोजी चंद्रपूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्व. दादासाहेब कन्नमवार सभागृहात ओबीसी, विजा, भज, विमाप्र, अनुसूचित जाती आणि जमाती यांची संयुक्त सहविचार बैठक संपन्न झाली. (पुरापासून वाचण्यासाठी आता चंद्रपुरात उभी राहणार संरक्षण भिंत)
ओबीसी समाजाची तातडीने जातिनिहाय जनगणना करण्यात यावी आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील हक्कांवर गदा आणणारा राज्य सरकारचा निर्णय पूर्णपणे रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा परीक्षेच्या संधींची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती आता केवळ राखीव प्रवर्गातच केली जाईल आणि त्यांना खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा सांगता येणार नाही, असा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. सध्या या निर्णयाला केवळ तात्पुरती स्थगिती देण्यात आली असली तरी तो रद्द करण्यात आलेला नाही, तसेच सरकारने यावर विधी व न्याय विभागाचे मत मागविले आहे. सरकारच्या या अन्यायकारक भूमिकेविरोधात बैठकीत तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला.
या बैठकीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी एक महत्त्वपूर्ण ठराव मांडला, ज्याला सर्वांनी एकमताने मंजुरी दिली. या ठरावानुसार, रविवार दिनांक २८ जून २०२६ रोजी चंद्रपूर येथे 'महामोर्चा' काढण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच, जोपर्यंत जनगणना आयुक्त ओबीसींच्या जातिनिहाय जनगणनेसाठी भारत सरकारचे राजपत्र (गॅझेट) प्रसिद्ध करत नाहीत, तोपर्यंत आगामी जनगणनेवर पूर्णपणे असहकार पुकारण्याचे आवाहन राजुरकर यांनी यावेळी केले. बैठकीला उपस्थित असलेल्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनीही या लढ्याला जाहीर पाठिंबा दिला. जोपर्यंत जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम येत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, अशी ग्वाही देत बहुजन समाजावर अन्याय करणारा १४ मे चा शासकीय निर्णय राज्य सरकारने त्वरित रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, बहुजन समाजातील ही एकजूट भविष्यातही अशीच कायम राहणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या प्रसंगी व्यासपीठावर आणि बैठकीला चंद्रपूर महानगरपालिकेचे उपाध्यक्ष प्रशांत दानव, स्थायी समिती अध्यक्ष सौ. मनस्वी संदीप गीऱ्हे, विरोधी पक्षनेते राजेश अडुर, जनविकास सेनेचे पप्पू देशमुख, आदिवासी विकास परिषदेचे प्रमोद बोरीकर, केशव तीराणीक, ॲड. दत्ताभाऊ हजारे, धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष श्रीधर मालेकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, जयदीप रोडे, निलेश नन्नावरे उपस्थित होते.
तसेच महानगरपालिकेचे नगरसेवक वसंता देशमुख, आकाश साखरकर, भालचंद्र दानव, अभिषेक डोईफोडे, रामनरेश यादव, राहुल चौधरी, नगरसेविका सौ. सुनंदा धोबे, सौ. मनीषा बोबडे, सौ. श्वेता लांडगे, भावना बावनकर यांच्यासह ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे, सतीश भिवगडे, प्रशांत काळे, सुधाकर काकडे, सूर्यकांत खनके, प्रा. अनिल शिंदे, मुन्ना आवळे, प्रा. बबनराव राजुरकर, देवराव दिवसे, मोरेश्वर सूरकर, शंकर पाल, हरिश्चंद्र गौरकर, प्रभाकर गेडाम, बाळू सातपुते, डॉ. विजय हेलवेते, प्रा. रवी झाडे, शाम राजुरकर, नरेन गेडाम, गणेश आवारी, तुळशीराम देरकर, संतोष बांदुरकर, अरविंद मडावी, दत्तू कडुकर, मुबारक शेख आणि ओबीसी, विजा, भज, विमाप्र, अनुसूचित जाती व जमाती समाजातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके संचालन कृष्णा मेश्राम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार रामदास कामडी यांनी मानले.
Leave a Comment